साहित्य समाजाला सकारात्मक दिशेने घेऊन जाणारे हत्यार : कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी
सध्या सामाजिक वातावरण तापले आहे. या तप्त झालेल्या समाजावर साहित्याची झुळूक फुंकर घालू शकते. त्यामुळे साहित्यिकांनी समाजासाठी लिहित राहावे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
साहित्य हे केवळ काल्पनिक विषयांवर आधारलेली नसून साहित्य हा समाजाचा आरसा (Literature is the mirror of society) आहे. तसेच समाजाला सकारात्मक दिशेने घेऊन जाणारे हत्यार आहे. साहित्य जीवनाला दिशा देणार आणि समाजाला प्रश्न विचारणारे महत्त्वाचे माध्यम आहे. माणुसकी हरवली तर प्रगती हरवते, त्यामुळे याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांनी व्यक्त केले.
प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी व हिंदी विभाग, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भारत नवनिर्माण समिती यांच्या वतीने आयोजित 'बनारस लिट फेस्टिवल' च्या उद्घाटन प्रसंगी डॉ.सुरेश गोसावी बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.विजय खरे, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंह, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, मराठी विभागाचे प्रमुख तुकाराम रोंगटे , हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले, मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे, ब्रिजेश सिंह, प्रसिद्ध कवी मदन मोहन दानिश, नरेंद्र सिंह, बी. के. सिंह आदी उपस्थित होते.
मिलिंद जोशी म्हणाले, सध्या सामाजिक वातावरण तापले आहे. या तप्त झालेल्या समाजावर साहित्याची झुळूक फुंकर घालू शकते. त्यामुळे साहित्यिकांनी समाजासाठी लिहित राहावे.
डॉ. राजेंद्र सिंह यांनी बनारस लिट फेस्टिवलच्या आयोजनाची भूमिका मांडताना सांगितले, आपल्या देशाला फार मोठी संस्कृती असून या संस्कृतीतून आलेल्या साहित्याची जपवणूक करण्याची आवश्यकता आहे. मात्र, आपल्या उजव्या हाताचा अंगठा मोबाईल स्क्रोल करायचे काही थांबवत नाही. साहित्याला वाचण्यासाठी आणि समजण्यासाठी पेशन्स लागतो. एखादी कविता वाचायची असल्यास, एखादे पुस्तक वाचायचे असल्याच वेळ लागतो. तो पेशन्स हळुहळु या पिढिमध्ये संपत चालला आहे.
कार्यक्रमात डॉ. विजय खरे, सुनिताराजे पवार, मदन मोहन दानिश, डॉ. निवेदिता एकबोटे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. राजेंद्र सिंह यांनी बनारस लीट फेस्टिवल कार्यक्रम आयोजनाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रिजेश सिंह यांनी केले. उपस्थितांचे स्वागत सदानंद भोसले यांनी केले. तर नरेंद्र सिंह यांनी आभार मानले.सूत्रसंचालन वैजयंती जाधव यांनी केले.