‘या’ राज्यात बोर्डाचा पेपर फुटल्याने परीक्षाच रद्द; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची होतीय मागणी

इयत्ता अकरावी बोर्डाची परीक्षा सुरु असताना २१ मार्च रोजी गणिताचा पेपर होता. हा पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली आणि त्याचा परिणाम असा की पुढील सर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 18 शाळांमध्ये हा पेपर फुटला आहे. यात तीन सरकारी शाळांचाही समावेश आहे. या परीक्षा ६ मार्च ते २९ मार्च दरम्यान होणार होत्या.

‘या’ राज्यात बोर्डाचा पेपर फुटल्याने परीक्षाच रद्द; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची होतीय मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. विविध ठिकाणी आसाम बोर्डाच्या इयत्ता अकरावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, आज दि. २४ ते २९ मार्च या कालावधीत होणाऱ्या अकरावीच्या उर्वरित ३६ विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शिक्षणमंत्री रनोज पेगू यांनी ही माहिती दिल्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

या परीक्षा रद्द करण्यात झाल्यानंतर एनएसयूआय(National Students Union of India), एसएफआय(Students' Federation of India), एसएमएसएस आणि एएएसयू (All Assam Students Union) या संघटनांनी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करतानाच राज्य बोर्डाचे अध्यक्ष आर. सी. जैन यांना निलंबित करावे, असेही म्हटले आहे.

दरम्यान, इयत्ता अकरावी बोर्डाची परीक्षा सुरु असताना २१ मार्च रोजी गणिताचा पेपर होता. हा पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली आणि त्याचा परिणाम असा की पुढील सर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 18 शाळांमध्ये हा पेपर फुटला आहे. यात तीन सरकारी शाळांचाही समावेश आहे. या परीक्षा ६ मार्च ते २९ मार्च दरम्यान होणार होत्या.

शिक्षणमंत्र्यांनी याबाबत एक्सवर माहिती देताना म्हटले आहे की, परीक्षेची पुढील तारीख ठरवण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. या गैरप्रकारामुळे १० जिल्ह्यांतील १५ खासगी शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच, आणखी तीन शाळांविरुद्धही कारवाई करण्यात येणार आहे.

नववीचाही पेपर फुटला होता

पेपरफुटी प्रकरणी गुवाहाटी सीआयडी मुख्यालयात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस ठाण्यात आणखी १८ गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. १८ पैकी सर्वच केंद्रांवरून पेपर फुटला असल्याची शक्यता नाही. काही ठिकाणी प्रश्नपत्रिका संचाच्या पाकिटाचे सील फुटलेले आढळले होते. मागील आठवड्यात नववीच्या वर्गाचा इंग्रजीचा पेपर बारपेटा जिल्ह्यात व्हायरल झाल्यामुळे रद्द करण्यात आला होता.