केवळ 'गुड टच बॅड टच' ने बाल लैंगिक अत्याचार थांबणार नाहीत

शाळेची बदनामी होईल या भावनेने जर शाळेने हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर संबधित मुख्याध्यापक, संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. हे निदर्शनास आणून द्यावे.

 केवळ 'गुड टच बॅड टच' ने बाल लैंगिक अत्याचार थांबणार नाहीत

विशेष लेख : बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना आणि उपाय 


" लैंगिक शिक्षण मुलांना फक्त गुड टच बॅड टच (Good touch bad touch)विषयी सांगून होणार नाही. तसेच फक्त मुलांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांची बाल लैंगिक शोषणविषयी (Child sexual abuse)जनजागृती करून चालणार नाही.  शाळेतील सफाई कर्मचारी, मुलांची काळजी घेणार्‍या, त्यांना शी-शू ल घेऊन जाणार्‍या आया, शाळेतील शिपाई, मुलांची वाहतूक करणारे बस चालक, मदतनीस (School Peon, Bus Driver, Helper)यासर्वांची जनजागृती होणे आवश्यक आहे. मुलांच्या मदतीसाठी, यांच्या समुपदेशनासाठी  प्रत्येक शाळेत विशेष समिती असावी. त्याचप्रमाणे पॉस्को कायद्याची शाळेतील प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. "

बादलापूरची घटना अजून निवळली नसताना नुकतीच तशीच एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्र ढवळून निघाले आहे. शाळा, सामाजिक संस्था, पालक यांच्याकडून मुलांना गुड टच बॅड टच विषयी शिकवले जात आहे. तसेच बाल लैंगिक शोषण या विषयावर जनजागृती देखील होते. तरीसुद्धा हे प्रयत्न कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र आहे. लहान मुलांवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. या मागचे कारण काय असू शकेल, यावर काय उपाय करता येईल, याविषयी 'फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन -मुस्कान' या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा शुभदा रणदिवे  यांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधला. 

प्रश्न : बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कोणती पाऊले उचलावीत? 

   "फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन -मुस्कान ही संस्था बाल लैंगिक अत्याचारविरोधात काम करते. याविषयी जनजागृती करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून शाळांमध्ये सत्र घेतले जातात. बर्‍याच शाळांमध्ये बाथरूम मध्ये मुलांची मदत करण्यासाठी महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती केलेली असते. याशिवाय शाळेतील शिपाई, बस चालक, त्यांचे मदतनीस यांच्याशी मुलांचा संपर्क अधिक असतो. शाळेच्या वेळेत मुलांची जबाबदारी जितकी शाळेची असते, तितकीच या लोकांची देखील असते. त्यामुळे या लोकांकडून जर अशा स्वरूपाचा गुन्हा झाला तर तो अधिक गंभीर स्वरूपाचा असतो. या लोकांमध्ये याची जाणीव होण्यासाठी त्यांचे  ट्रेनिंग होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यांचे योग्य प्रशिक्षण झाले तर ते अधिक खबरदारी घेतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समजा त्यांच्यात एखादा 'पोटेन्शियल अब्युजर' (असा गुन्हा करू शकणारा संभाव्य व्यक्ती) असेल तर त्याला या ट्रेनिंगच्या माध्यमातून पॉस्को कायद्या विषयी माहिती होईल. त्याच्या त्या कृतीची परिणमकारकता, त्यामुळे होणार्‍या शिक्षा, त्याचे गांभीर्य या कायद्यांतर्गत होणारी कडक शिक्षा या विषयी माहिती होईल. यामुळे अशा घटनांना चाप बसू शकतो.बाल लैंगिक अत्याचार या विषयावर मुलांचे प्रबोधन जितके आवश्यक आहे, तेवढेच या विषयीची जागृती पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये देखील असली पाहिजे.  त्यासाठी शाळेत वारंवार याविषयाची सत्र झाली पाहिजेत. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र, त्यांच्याशी निगडीत मुद्यांवर सत्र घेतली जावीत."

प्रश्न: लैंगिक अत्याचाराविषयी माहिती लपवलीजाऊ नये, यासाठी काय करावे? 

" शाळांनी त्यांच्या पातळीवर काही खबरदारी घेण आवश्यक आहे. शाळांनी 'चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी बनवावी. जर अशी एखादा घटना घडली तर त्याची SOP (स्टँडर्ड ऑपरेशनल  प्रोसीजर) काय असावी? अशा घटना निदर्शनास आल्यानंतर पुढे काय करावे, आधी कोणाकडे तक्रार करावी, पुढे त्यावर काय acction घ्यावी  याचे दिशनिर्देश प्रत्येक शाळांनी ठरवलेले असावे. हे SOP शाळेने सूचना फलकावर लावावे. समजा एखाद्या शिक्षकानेच असे दुष्कृत्य केले असेल आणि याची माहिती दुसर्‍या शिक्षकाला झाली तर त्याने काय करावे? त्या शिक्षकाने आरोपी शिक्षकाविषयी वरिष्ठांकडे याची तक्रार करणे, याविषयी त्यांना माहिती देणे हे फक्त त्याचे कर्तव्य नसून मँडेटरी (बंधनकारक) आहे. याला  'मँडेटरी रिपोर्टिंग' असे म्हटले जाते. म्हणजे आरोपी शिक्षक हा आपला सहकारी किंवा मित्र आहे या भावनेने दूसरा शिक्षक गप्प बसला तर हा कायद्याने गुन्हा आहे. नंतर जर हे प्रकरण उघड झाले तर त्या शिक्षकाला देखील 'मँडेटरी रिपोर्टिंग' न केल्याबद्दल  कायदेशीर शिक्षा होऊ शकते. समजा ही घटना शाळेबाहेर घडली असेल आणि त्या पीडित विद्यार्थ्याने एखाद्या शिक्षकाकडे याविषयी तक्रार केली तरी त्या शिक्षकाकडून 'मँडेटरी रिपोर्टिंग' होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत त्या शिक्षकाने आमच्या सारख्या संस्थांना, शाळेची ट्रस्ट, मुख्याध्यापक असतील त्यांना याविषयी कल्पना द्यावी," 

प्रश्न: शिक्षकांची भूमिका किती महत्वाची असते. त्यांनी या प्रकरणात काय करावे. 


 "शिक्षक म्हणून अशा बाबतीत त्यांची विशेष जबाबदारी असते. वर्गातील एखादा हुशार, चपळ, बोलका, मस्तीखोर विद्यार्थी अचानक शांत राहायला लागला, त्याच्या वागणुकीत बदल जाणवतोय, ती पूर्वी सारखा अभ्यास करत नाहीये, त्याचे वर्गात लक्ष नसते, तो पूर्वीसारखा बोलत नसेल, इतर मुलांसोबत खेळत नसेल, वर्गात सारखा झोपत असेल या बदलांचे कारण वेगळेही असू शकेल. पण खबरदारी म्हणून त्या शिक्षकाने मुख्याध्यापकांशी बोलून पालकांशी याविषयी संपर्क साधावा. सध्या बर्‍याच शाळांमध्ये समुपदेशन समिती असते त्या समितीची देखील ते शिक्षक मदत घेऊ शकतात. शिक्षकांनी त्यांच्या पातळीवर घेण्याची खबरदारी म्हणजे त्यांना जर एखाद्या शिक्षकाच्या वर्तणुकीबद्दल शंका असेल तर त्यांनी आधी त्यांच्या विद्यार्थिनींशी संपर्क साधून मुलींना शंका येणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलावे, ज्या शिक्षकावर शंका आहे ते मुलींशी कसे वागतात? कसे बोलतात? अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलतात का? एकस्ट्रा क्लासेसच्या नावाने मुलींना वेगळं बोलावलं जातं का? या बाबींची माहिती घेऊन याची कल्पना संस्थेला, मुख्याध्यापकाना, आमच्या सारख्या संस्थांना द्यावी. शक्यतो कोणत्याही पुरुष शिक्षकाने मुलींना एक्सट्रा क्लासेससाठी वेगळे बोलावणे टाळावे. त्यांचा हेतु वाईट नसेलही पण तरीसुद्धा त्यांनी खबरदारी म्हणून एक्सट्रा क्लासेसचा विषय टाळावा.अशा घटनांची जबाबदारी त्या शाळेची, संस्थेची,  मुख्यध्यपकाची असते. शाळेची बदनामी होईल या भावनेने जर शाळेने हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर संबधित मुख्याध्यापक, संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. हे निदर्शनास आणून द्यावे.

प्रश्न : पालकांनी काय करावे? या घटनेतील पिडीत मुलांना न्याय कसा मिळू शकतो? 

फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन -मुस्कान  या संस्थेतर्फे पालकांसाठी सुद्धा सत्र आयोजित केली जातात. हा विषय खूप नाजुक असल्यामुळे याविषयी मुलांशी कसं बोलणार? बोलताना कोणते शब्द वापरले पाहिजेत? सहजपणे बोलताना मुलांना याविषयी कशा सूचना केल्या जाऊ शकतात ? मुलांना सक्षम कसं बनवणार? याचे प्रशिक्षण पालकांना मिळणे आवश्यक आहे. अशा घटनांवर प्रतिबंद आणण्यासाठी नियमित सत्र, शिबिरे घेणे  महत्वाचे आहे. पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचे सेवक कर्मचारी आणि विद्यार्थी अशा वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळी सत्रे आयोजित केली जावीत. मुस्कान ही संस्था लैंगिक अत्याचारविरोधात काम करते. प्रतिबंधात्मक किंवा एखादी घटना झाल्यानंतर त्यावरील केसवर्क, कायदेशीर बाबी सांभाळून पिडीत ग्रस्त विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करते.

(मुलाखतकार : दीपा पिल्ले)