परीक्षेचा निकाल जाहीर करायला एवढा वेळ का?; मंत्री चंद्रकात पाटील यांना वेलणकरांचा सवाल
शेजारील कर्नाटक राज्यात अशीच सीईटी १० ते २५ मे या कालावधीत घेतली गेली आणि त्याचा निकाल फक्त १३ दिवसांत म्हणजे ७ जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र, राज्यात सीईटी निकालातील दिरंगाई अक्षम्य आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Examination) घेतल्या जाणाऱ्या इंजिनीअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चर (Engineering, Pharmacy, Agriculture) या अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निकाल (CET Result) १६ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा १९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत संगणक आधारित (CBT mode) घेण्यात आली होती. संगणकावर घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करायला सीईटी सेलला ४० दिवस का लागावेत असा प्रश्न पुण्यातील सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar, President of the Aware Citizen Forum) यांनी पत्राद्वारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील (State Higher and Technical Education Minister Chandrakat Patil) यांना उपस्थित केला आहे.
याशिवाय, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये तब्बल ४० चुका आहेत. यंदा महाराष्ट्र बोर्डाने बारावीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेला १४ लाख मुले बसूनही ५५ दिवसांत निकाल जाहीर केला गेला. या पार्श्वभूमीवर केवळ ७ लाख मुले संगणकावर घेतलेल्या सीईटी परीक्षेला बसूनही निकाल जाहीर करायला ४० दिवस का लागतात हे न उलगडणारे कोडे आहे. तसेच शेजारील कर्नाटक राज्यात अशीच सीईटी १० ते २५ मे या कालावधीत घेतली गेली आणि त्याचा निकाल फक्त १३ दिवसांत म्हणजे ७ जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र, राज्यात सीईटी निकालातील दिरंगाई अक्षम्य आहे. बारावीचा निकाल लवकर लागूनही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचा निकाल त्यानंतर तब्बल ४० दिवसांनी जाहीर होतो हे विद्यार्थ्यांचे दुर्दैव असल्याचेही वेलणकर यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांची पुढील प्रवेश प्रक्रिया संथ गतीने चालते आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरु व्हायला १५ ऑगस्ट उजाडतो. ही दिरंगाई अनाकलनीय असल्याचे सांगत याचा निषेधही त्यांनी केला आहे.
eduvarta@gmail.com