शासकीयसह खासगी शाळांचाही 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात सहभाग

विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले आहे.

शासकीयसह खासगी शाळांचाही  'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात सहभाग

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविले जात असून पुणे जिल्ह्यातही १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालाधीत हे अभियान राबविले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांनी (All schools)यात सहभागी व्हावे,असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड (Primary Education Officer Sandhya Gaikwad) यांनी केले आहे.

शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यातून स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना १ लाखांपासून ते ५१ लाख रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यात तालुकास्तरावरील स्पर्धेत शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रथम क्रमांकासाठी ३ लाख, द्वितीयसाठी २ लाख, तर तृतीयसाठी १ लाख रुपये पारितोषिक दिले जाईल.

हेही वाचा : CBSE कडून विद्यार्थी आणि पालकांचे आजपासून मानसशास्त्रीय समुपदेशन

जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस ११ लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख, विभागस्तरावर प्रथम २१ लाख, द्वितीय ११ लाख आणि तृतीयसाठी ७ लाख रुपये, तर राज्य पातळीवर प्रथम ५१ लाख, द्वितीय २१ लाख आणि तृतीयसाठी ११ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनाही एवढेच बक्षीस दिले जाणार आहे.त्यामुळे खासगी शाळांनी सुध्दा यात सहभागी व्हावे,असेही आवाहन गायकवाड यांनी केले आहे. 

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक याच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे हे अभियानाचे उदिष्ट आहे.