चंद्रकांत पाटील यांच्याकडून आश्वासन; पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आंदोलन स्थगित

येत्या मंत्रिमंडळ बैठकीत जर यावर तोडगा निघाला नाही तर बुधवार (२४ सप्टेंबरपासून) पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा निर्णय संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीने घेतला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडून आश्वासन; पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आंदोलन स्थगित
Phd students meets minister Chandrakant Patil in pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

PHD विद्यार्थ्यांच्या फेलोशीपच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil, higher and technical education minister of maharashtra)यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुण्यातील गुडलक चौक येथे सुरू केलेले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.मात्र,सध्या आंदोलन स्थगित झाले असले तरी शासनाकडून संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी साठी निधी उपलब्ध करून दिला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, आर्टी (Sarthi, Barti, Mahajyoti, Amrut, Arti)आदी संस्थांच्या शिष्यवृत्तीसाठी संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या वतीने डेक्कन चौकात आंदोलन सुरु होते. त्यावर मार्ग काढण्यासाठी समितीच्या शिष्टमंडाळाने चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन कृती समितीला दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय समन्वय कृती समितीने घेतला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याबाबत चर्चा झाली. यावेळी युवासेना नेते किरण साळी, नितीन आंधळे, पूजा झोळे, विद्यार्थी भारत पवार, अंकुश चौगुले, परिमल कुंभार, अभाविपचे राधेय बाहेगव्हाणकर, अलोक पवार, सई थोपटे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

येत्या  २३ सप्टेंबर २०२५ रोजी मंत्री मंडळाच्या बैठकीसाठी कृषी संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या वतीने काही प्रतिनिधी सोबत चर्चा करून अंतिम सकारात्मक निर्णय कृषी संशोधकांच्या अधिछात्रवृत्ती संदर्भात घेण्यात येईल,असे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासित केले. कृषी संशोधक विद्यार्थ्यांनी सरकारकडून सकारात्मकपणे त्यांच्या मागण्या पूर्ण होतील,अशी आशा व्यक्त केली. कृषी साठी प्रत्येकी १०० जागा प्रत्येक संस्थेसाठी राखीव ठेवाव्यात. संस्थेमार्फत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर  बुधवारी  24 सप्टेंबर पासून विद्यार्थी पुन्हा उपोषणाला बसतील, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असल्याचे  कृषी संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीतर्फे कळाव्यात आले आहे.

पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या काय आहेत भावना पाहा व्हीडिओ -