MPSC चे अध्यक्ष आता राजीनामा देणार का?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या ३० एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट (MPSC Hall Ticket) हॅक झाल्याची माहिती समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये (Students) संभ्रम निर्माण झाला आहे. आयोगाने सर्व गोष्टींची शहानिशा करून मगच नियोजित वेळेत पारदर्शकपणे परीक्षा घ्यावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर (Rahul Kavthekar) यांनी केले आहे. तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देणार आहेत का?, असा सवाल स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड संघटनेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर (Kuldeep Ambekar) यांनी केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या ३० एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ९० हजारापेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलीग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आले आहेत. हॅकरने आपल्याकडे केवळ हॉल तिकीटच नाही तर प्रश्नपत्रिका असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा : प्रश्नपत्रिका गोपनीय राहतील का? प्रवेशपत्र लिक झाल्याने विद्यार्थी चिंतेत
आयोगाने याचे खंडन केले आहे. असे असले तरी आयोगाने या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी, अशी भूमिका विविध विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केली आहे. राहुल कवठेकर म्हणाले, विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हॅक झाल्याची माहिती आम्हीच आयोगाच्या अधिकाऱ्यांना कळवली होती. आयोगाने त्यानंतर खबरदारीचा उपाय योजना केल्या आहेत. तसेच पोलिसांकडेही याबाबत तक्रार दिली आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोगाकडून पारदर्शकपणे परीक्षा घेतल्या जात आहेत, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये आयोगाने निर्माण करावा.
हेही वाचा : प्रवेशपत्र लिक झाल्याची MPSC कडूनही कबुली; प्रकरण थेट पोलिसांत
स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड संघटनेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर म्हणाले, एमपीएससीची माहिती लिक झाल्याचा प्रकार चिंता व्यक्त करणार आहे त्यामुळे आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. विद्यार्थ्यांनी आंदोलने केली किंवा ट्विटरवर काही प्रतिक्रिया व्यक्त केली तर विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई केली जाते त्यांच्यावर दबाव टाकला जातो. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेतून बाद केले जाते. आता या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देणार आहेत का? तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी व्हायला हवी, त्यात निश्चितच काहीतरी चुकीचे घडल्याची शक्यता आहे, अशी भीती आंबेकर यांनी व्यक्त केली.
''आरोग्यभरती, टी.ई.टी. पेपरफुटीचे प्रकार यापूर्वी झालेले आहेत, मात्र सरकारने याकडे गंभीरपणे लक्ष दिलेले दिसत नाही. त्यामुळेच असे प्रकार घडत आहेत, असे वाटतेय. विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट थेट टेलिग्राम चॅनल वर टाकणे खूप गंभीर आहे. शासनाने त्वरित दखल घेऊन असे प्रकार भविष्यात होणार नाहीत, यासाठी तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी. घटना घडल्यावर जाग येणार असेल तर अवघड आहे. त्यामध्ये भर म्हणजे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी MPSC सारख्या विश्वसनीयता असलेल्या संस्थेवर किती विश्वास ठेवायचा असाही प्रश्न उपस्थित होत आहे.''
- कमलाकर शेटे, कार्यवाह - युवक क्रांती दल (युक्रांद) पुणे शहर