मुंबई विद्यापीठात आजपासून 'दूरस्थ' अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पहिल्यांदाच या शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) एम.ए.समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू केला जाणार आहे. या अभ्यासक्रमाची सर्व प्रकिया ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे.

मुंबई विद्यापीठात आजपासून 'दूरस्थ' अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नोकरी अथवा अन्य कारणांमुळे उच्चशिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (Centre for Distance and Online Education) म्हणजेच पूर्वीच्या आयडॉलच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Online admission process for various courses at undergraduate and postgraduate levels) सुरू होत आहे. ही प्रवेश प्रक्रिया आज १४ जून रोजी सुरु होणार असून विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याचे वेळापत्रक (timetable) मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पहिल्यांदाच या शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) एम.ए.समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू केला जाणार आहे. या  अभ्यासक्रमाची सर्व प्रकिया ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे.

यामध्ये पदवी स्तरावरील बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी), बी.कॉम. (कॉमर्स, अकौंटन्सी, आणि बिझनेस मॅनेजमेंट), बी.कॉम.(अकौंट अँड फायनान्स), बीएससी (माहिती तंत्रज्ञान), बीएससी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमाचा समावेश आहे

तर पदव्युत्तर पदवी स्तरावरील एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क), एम. कॉम. (अॅडव्हान्स अकौंटन्सी), एम.कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एससी. (गणित), एम.एससी. (माहिती-तंत्रज्ञान), एम.एससी (संगणकशास्त्र) एमएमएस, एमसीएय या सर्व अभ्याक्रमाचा समावेश असणार आहे.

दरम्यान, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाते, ज्याद्वारे विद्यार्थी आपल्याला हव्या त्या अभ्यासक्रमात शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवू शकतात.