दहावीच्या विद्यार्थ्यांना 'या' विषयाचे अतिरिक्त गुण मिळणार का ? बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले ..

आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि बोर्डाचे सचिव यांना लिहिले आहे. 

दहावीच्या विद्यार्थ्यांना 'या' विषयाचे अतिरिक्त गुण मिळणार का ? बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले ..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दहावीचा विज्ञान (10th Science) भाग - एक या विषयाच्या बोर्डाच्या पेपरमध्ये प्रश्न 1 (B) मधील i क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा.’ या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. याबाबत अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल, असे पत्र आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि बोर्डाचे (State Board Of Maharashtra) सचिव यांना लिहिले आहे. मात्र, मुख्य मॉड्रेटर यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना गुण द्यावेत किंवा देऊ नयेत; यावर बोर्डाकडून निर्णय घेतला जाणार आहे,से महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi, Chairman, Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) यांनी सांगितले.

आमदार कपिल पाटील यांनी राज्य मंडळाला पत्र पाठवले असून त्यात वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता त्याचे अचूक उत्तर 'हायड्रोजन' हे आहे. मात्र काही शाळांमध्ये याचे उत्तर 'हेलियम' असल्याचे तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर 'हायड्रोजन' असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे,असे नमूद करण्यात आले आहे. त्याचाप्रमाणे  हायड्रोजनच्या अणुत्रिजेची गणना मूल्य 53 pm आहे तर हेलिअमच्या अणुत्रिजेचे गणना मूल्य 31 pm आहे. कारण,  जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो. तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते. हायड्रोजन हा द्वि-आण्वीय वायू आहे तर हेलिअम हा एक-अण्वीय वायू आहे. त्यामुळे, अणुत्रिज्यांच्या गणना केलेल्या मूल्यांची तुलना करणे योग्य नाही. दोन्ही अणूंची 'बॅन दे वॉल्झ' (Van der Waals) त्रिज्यांची तुलना करणे अधिक योग्य ठरेल. हायड्रोजन अणूची बॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 120 pm आहे तर हेलिअम अणूची वॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 140 pm आहे,असेही कपिल पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल. पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी का करायचे ? वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरिता एक गुणही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल. तरी कृपया इयत्ता दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तराबाबत खुलासा करावा, असे कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमुद केले आहे. 

--------------------------------

कपिल पाटील यांनी पाठवलेले पत्र संबंधित विषयाचे मुख्य मॉड्रेटर यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. मॉड्रेटर यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार बोर्डाकडून गुण देण्यासंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच परीक्षा मंडळालाही याबाबत सूचित केले जाईल. 

- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे