पाच वर्षांची लॉ पदवी तीन वर्षांची होणार का ?  न्यायालयने दिला हा निर्णय.. 

"तीन वर्षांचा अभ्यासक्रम का... विद्यार्थी हायस्कूलनंतरच कायद्याचा सराव सुरू करू शकतात" अशी उपहासात्मक टिप्पणीही यावेळी न्यायालयाने केली.

पाच वर्षांची लॉ पदवी तीन वर्षांची होणार का ?  न्यायालयने दिला हा निर्णय.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गरीब विद्यार्थ्यांचा विचार करून कायद्याची पदवी घेण्यासाठी लागणारा 5 वर्षांचा कालावधी कमी करून 3 वर्ष करावा,अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालायाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 

पाच वर्षांच्या कायद्याची पदवी थेट तीन वर्षांची करावी, अशी मागणी मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने फेटाळली आहे. "तीन वर्षांचा अभ्यासक्रम का... विद्यार्थी हायस्कूलनंतरच कायद्याचा सराव सुरू करू शकतात" अशी उपहासात्मक टिप्पणीही यावेळी न्यायालयाने केली.
" न्यायालयाने सांगितले की, पाच वर्षांचा एलएलबी (बॅचलर ऑफ लॉ) हा अभ्यासक्रम “चांगले काम करत आहे” आणि त्यात छेडछाड करण्याची गरज नाही. खरेतर  5 वर्षे देखील खूप कमी आहेत. आम्हाला या व्यवसायात परिपक्व लोकांची गरज आहे. हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम खूप फायदेशीर ठरला आहे. "

"युनायटेड किंगडममध्येही कायद्याचा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे आणि सध्याचा पाच वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम गरिबांसाठी, विशेषतः मुलींसाठी निराशाजनक आहे," असे याचिकेत सांगण्यात आले होते. यावर सरन्यायाधीशांनी  सांगितले की "यावेळी 70 टक्के महिलांनी जिल्हा न्यायव्यवस्थेत प्रवेश केला आहे आणि आता अधिक मुली कायदा स्वीकारत आहेत."

सध्या, विद्यार्थी बारावी नंतर पाच वर्षांचा एकात्मिक कायद्याचा अभ्यासक्रम करू शकतात, ज्यासाठी त्यांना आघाडीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLUs) द्वारे स्वीकारलेली कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT) उत्तीर्ण करावी लागेल. विद्यार्थी कोणत्याही शाखेतील पदवीनंतर तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रमही करू शकतात.