5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल कधी; पुन्हा चौथी, सातवीसाठी परीक्षा घेणार का?
सर्वसाधारणपणे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होतो. परंतु, जुलै महिना उजाडला तरीही अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
scholarship exam: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Examination Council)माध्यमातून फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल (Final result of 5th and 8th scholarship exam)केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे. परंतु, काही कारणांमुळे जुलै उजाडला तरीही अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल येत्या आठ दिवसात जाहीर होणार असल्याचे परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीसाठी व आठवीसाठीच असणार की इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणार ? याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचेही अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात संभ्रम कायम आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पुरता निकाल 25 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला. सर्वसाधारणपणे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होतो. परंतु, जुलै महिना उजाडला तरीही अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यातच इयत्ता पाचवी व आठवी ऐवजी पुन्हा इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याबाबत शासन स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र,अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. शाळा सुरू झाल्यामुळे आता कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करायचा? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
परीक्षा परिषदेतर्फे अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी आवश्यक असणारी अचूक माहिती शिक्षण अधिकाऱ्यांकडून वेळेत प्राप्त झाली नाही. त्यामुळे गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम अजूनही सुरू आहे. पुढील आठ दिवसात हे काम पूर्ण होईल व अंतिम निकाल जाहीर केला जाईल, असे परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ' एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले.
शिष्यवृत्ती परीक्षा चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ?
नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात झाली असून काही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. परंतु, इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल की चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होणार ? ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहे. शिक्षण विभागाने याबाबत संभ्रम लवकर दूर केला तर विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी अवधी मिळेल. त्यामुळे याबाबतचा संभ्रम लवकर दूर होणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
------------
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो. काही पालक या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळांची निवड करतात. परंतु, निकालास विलंब झाला आहे. शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा त्याचप्रमाणे यावर्षी चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार की नाही याबाबतचा संभ्रम दूर करावा.
- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ
------------------------
eduvarta@gmail.com