पुणे जिल्ह्यात आणखी 14 समूह शाळा ; गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर  

पुणे जिल्ह्यात आणखी 14 समूह शाळा ; गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर  

(राहुल शिंदे)
 
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे जिल्ह्यातील वेल्हा व मुळाशी तालुक्यातील (Velha and Mulashi Talukas of Pune District) 14 शाळांचे प्रस्ताव समूह शाळेसाठी (cluster schools) प्राप्त झाले आहेत. सध्या ही सर्व प्रक्रिया अत्यंत प्राथमिक स्तरावर असून पुढील काळात या प्रस्तावांची तपासणी करून व उपयुक्तता विचारा घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच समूह शाळेत सहभागी होण्यास तयार असणाऱ्या शाळांच्या व्यवस्थापन समितीसह सर्व घटकांशी चर्चा करून व मान्यता घेऊन शासनाने प्रसिध्द केलेल्या नियमावलीनुसार पुणे जिल्ह्यात आणखी काही समूह शाळा उभ्या करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

पुणे जिल्ह्यातील पानशेत येथील समूह शाळेच्या धरतीवर राज्यभरातून समूह शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.राज्यातील काही जिल्ह्यांमधून शिक्षण विभागाकडे समूह शाळेसाठीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.मात्र, पानशेतनंतर पुण्यात आणखी काही समूह शाळा उभ्या राहू शकतात का ? याबाबत उत्सुकता होती. परंतु, जिल्ह्यातील केवळ भोर व मुळाशी तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून समूह शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.संबंधित प्रस्तावित समूह शाळांची यादी शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आली आहेत.त्यात वेल्हा तालुक्यातील विंझर, गुंजावणे, मांगदरी, वांगणवाडी, बोरावळे आणि अंबवणे या शाळांचा समावेश आहे.तर मुळशी तालुक्यातील उरवडे, आंदगाव, माले, तम्हिणी, निवे, वांद्रे, आंबावणे, भांबर्डे या समूह शाळा म्हणून प्रस्तावित आहेत.यातील शाळांमध्ये 60 ते 400 विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता आहे.

हेही वाचा : शासकीयसह खासगी शाळांचाही 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात सहभाग

 शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावित समूह शाळांमध्ये दोन्ही तालुक्यातील एकूण 73 शाळांना सामावून घेता येऊ शकते. प्रस्तावित समूह शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी वाहतुकीवर मोठा खर्च होणार नाही,असेही या प्रस्तावात दिसून येत आहे.मात्र, हा प्रस्ताव स्वीकारला जाणार की नाकारला जाणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.

--------------------------

 "जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे मुळाशी व वेल्हा तालुक्यातील प्रस्तावित समूह शाळांचे प्रस्ताव गट शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले आहेत.त्यात वेल्हा तालुक्यातील 6 व मुळाशी तालुक्यातील 8 शाळांचा समावेश आहे. "

- संध्या गायकवाड, प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद,  पुणे