UPSC result :पोलीस अंमलदाराचा मुलगा झाला साहेब....
शुभम ३५९ वी रॅंक मिळवत परीक्षेत यशस्वी झाला.ही वार्ता समजताच पोलीस दलात अंमलदार म्हणून काम करणाऱ्या थिटे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Police Commissionerate)पोलीस (Police)अंमलदार म्हणून काम करणाऱ्या भगवान थिटे (Bhagavan Thite)यांना आपल्याही मुलाने यूपीएससी परीक्षा(upsc exam) द्यावी, आयएएस/आयपीएस (IAS/IPS)होऊन अधिकारी व्हावे ,अशी अपेक्षा उराशी बाळगून मुलाला लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवले... आणि मुलगा शुभम थिटे (Shubham Thete)याने यूपीएससी मध्ये 359 वी रॅंक मिळवत वडिलांचे स्वप्न साकार केले. केक कापून मुलगा साहेब झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू तरळे....
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे मंगळवारी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेत आपला मुलगा यश संपादन करेल, याची पोलीस अंमलदारभगवान थिटे यांना खात्री होती. मंगळवारी निकाल जाहीर झाला, शुभम ३५९ वी रॅंक मिळवत परीक्षेत यशस्वी झाला.ही वार्ता समजताच पोलीस दलात अंमलदार म्हणून काम करणाऱ्या थिटे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
'एज्युवार्ता'शी बोलताना भगवान थिटे म्हणाले, पोलीस दलात काम करत असल्यामुळे दररोज आयएएस / आयपीएस अधिकाऱ्यांना पाहत होतो. आपल्याही मुलाने आयएएस/आयपीएस व्हावे म्हणून त्याला लहानपणापासूनच याबाबत गोडी लावली. अधिकारी झाल्यामुळे लोकसेवा कशी करता येते, याबद्दल शुभमला सांगितले. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुद्दाम अधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घडवून आणल्या. अधिकाऱ्यांच्या मुलाखती ऐकवल्या. त्यातून शुभमला प्रोत्साहन मिळत गेले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर येथील लहानशा गावातून येऊन मी पोलीस दलात सेवा देत आहे. शुभमला मेकॅनिकल इंजीनियरिंगचे शिक्षण दिले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही शुभमने युपीएससीचा अभ्यास करून त्यात यश संपादन केले, याचा मनस्वी आनंद होत आहे, असेही थिटे यांनी सांगितले.