शिक्षण व्यवस्थेसाठी शरमेची बाब, रॅगिंग प्रकरणात महाराष्ट्रातील 'हे' विद्यापीठ देशात तिसर्या स्थानी
नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंग तक्रारींचे हाॅसस्पाॅट ठरले आहे. नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात २०२२ ते २०२४ दरम्यान राज्यातील सर्वाधिक ६१ रॅगिंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हे विद्यापीठ रॅगिंग तक्रारीमध्ये देशात तिसऱ्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक अहवालातून भारतीय शिक्षण व्यवस्थेचे रॅगिंग प्रकरणातील भयानक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे या अहवालात राज्यातील नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra University of Health Sciences Nashik) रॅगिंग तक्रारींचे हाॅटस्पाॅट (Ragging complaint Hotspot) ठरले आहे. नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात २०२२ ते २०२४ दरम्यान राज्यातील सर्वाधिक ६१ रॅगिंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हे विद्यापीठ रॅगिंग तक्रारीमध्ये देशात तिसऱ्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोसायटी अगेन्स्ट व्हायोलन्स इन एज्युकेशन (सेव्ह) या संस्थेच्या अहवालातून (Society Against Violence in Education Report) हे भयानक वास्तव समोर आले आहे.
स्टेट ऑफ रॅगिंग इन इंडिया २०२२-२४ अहवालानुसार, वैद्यकीय महाविद्यालये रॅगिंगसाठी 'हॉटस्पॉट' ठरत आहेत. रॅगिंगच्या एकूण तक्रारींपैकी एआय इमेज ३८.६ टक्के तक्रारी या मेडिकल कॉलेजमधून आल्या आहेत. यातील ३५.४ टक्के तक्रारी गंभीर आहेत. मेडिकल कॉलेजेसमध्ये देशातील केवळ १.१ टक्के विद्यार्थी शिकत असताना तीन वर्षात रॅगिंग संदर्भातील तब्बल ४५.१ टक्के विद्यार्थ्यांचे मृत्यू हे मेडिकल कॉलेजमधून होत आहेत. इतर महाविद्यालयांच्या तुलनेत ३० पट अधिक रॅगिंग हे मेडिकल कॉलेजमध्ये होत आहे.
राष्ट्रीय रॅगिंग विरोधी हेल्पलाइनवर नोंदवलेल्या ३ हजार १५६ तक्रारींवर आधारित या अहवालात रॅगिंगशी संबंधित ५१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले आहे. याच कालावधीत राजस्थानमधील कोचिंग हब असलेल्या कोटा येथे नोंदवलेल्या गेलेल्या प्रकरणात ५७ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या नोंदवल्या गेल्या आहेत. याचा अर्थ, कोटा येथील कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी रॅगिंग पेक्षाही अधिक प्रमाणात मृत्यूच्या दारात ढकलले गेले, हे उघड आहे.
कोवळ्या वयातील विद्यार्थी खाजगी कोचिंग क्लासेसमुळे मृत्यू ला जवळ करित असतील तर, अशा कोचिंग क्लासेसवर बंदी आणायला हवी. अहवालात तक्रारींच्या संख्येच्या आधारे संस्थांना देखील क्रमवारी देण्यात आली आहे, ज्यामध्ये नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रासारख्या विचारांचे अधिष्ठान असलेल्या राज्यासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. नाशिक सारख्या शहरात शासकीय वैद्यकीय उच्चशिक्षण संस्था म्हणजे विद्यापीठात घडणाऱ्या या बाबीला वेळीच आवर घातला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होत असताना विद्यापीठ यंत्रणा गपगार कशा, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो.