नेट-सेटमधून सूट, प्राध्यापक पदोन्नती आणि वेतनश्रेणी प्रश्न मार्गी लागणार ? चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक
पुढील काळात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक यांच्या पदोन्नतीचे लाभ देय दिनांकापासून पूर्ववत लागू करणे. नेट-सेटमधून सूट (Exemption from net-set) मिळवण्यासंदर्भात एम.फिल अर्हताधारक प्राध्यापकांचे विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (University Grants Commission) पाठवलेल्या प्रस्तावाबाबत उच्च शिक्षा मंत्रालय स्तरावरून पाठपुरावा करून एम.फिल धारक प्राध्यापकांचे प्रश्न निकाली काढणे, यासह अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे पुढील काळात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे (Teaching and non-teaching staff) प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या बैठकीत अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदवी महाविद्यालयातील प्राचार्यांना अकॅडमी लेवल 14 ही वेतनश्रेणी लागू करणे. नांदेड, अमरावती आणि कोल्हापूर विभागातील काही अध्यापकांचे ऑफलाइन असलेले वेतन ऑनलाईन करणे. निवृत्त होणाऱ्या व झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण मिळणे आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार डॉ.मनीषा कायंदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव संतोष खोरगडे, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.