नेस वाडिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा जागर
हस्तकला, खाद्यपदार्थ, पर्यावरणपूरक वस्त्र, आणि इतर सर्जनशील उत्पादने विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवली.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये (Nes Wadia College of Commerce)१६ आणि १७ जानेवारी २०२५ रोजी "उद्योजकता मेळावा २०२५" या उपक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वीपणे करण्यात आले. कॉलेज कॅम्पस मध्ये आयोजित या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसायिक स्टॉल्स उभे करून विविध प्रकारच्या उत्पादांची विक्री केली. या मेळाव्याने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा जागर आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी एक अनोखी संधी निर्माण केली.
कॉलेजच्या प्राचार्य प्रा. डॉ. वृषाली रंधीर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पी. एन.चौधरी, डॉ.एल.एस.बैसाणे, डॉ.आर.एस.मसदे, डॉ.आर. बी.सोनवणे, डॉ. महेंद्र आगळे,डॉ.राजेश राऊत,डॉ. पी. बी. व्यंकटे डॉ. भरत राठोड तसेच शिक्षक जास्मिन शिकलगर, काकासाहेब मुळे , डॉ. उज्वल खामकर वैशाली मोरे, धनश्री फड आणि अपर्णा जौंजाळ यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजित करण्यात आले. सर्वांच्या अथक परिश्रमानंतर मेळाव्याचे आयोजन अत्यंत सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडले.
उद्योजकता मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगाशी जुळवून घेणे, त्यांच्या कल्पकतेला वाव देणे आणि त्यांना त्यांच्या उत्पादनांचे व्यावसायिक प्रमोशन करण्याची संधी प्रदान करणे होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि मेहनतीचा उपयोग करून विविध उत्पादनांची निर्मिती केली. हस्तकला, खाद्यपदार्थ, पर्यावरणपूरक वस्त्र, आणि इतर सर्जनशील उत्पादने विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवली.
विद्यार्थ्यांनी विविध ४० स्टॉल्स उभारले होते. जिथे त्यांनी आपल्या उत्पादनांचा प्रचार आणि विक्री केली. या स्टॉल्सवर हस्तनिर्मित गहणी, इको-फ्रेंडली वस्त्र, घरगुती खाद्यपदार्थ, आरोग्यवर्धक उत्पादने आणि अन्य नवकल्पक वस्त्रांची विक्री करण्यात आली.तसेच यावेळी उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांशी विचारांची देवाण-घेवाण आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील भविष्याच्या संधींबद्दल चर्चा करण्याची एक उत्तम संधी मिळाली. या मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे नेटवर्क वाढविण्याची आणि इतर उद्योजकांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली.
काही यशस्वी उद्योजक आणि उद्योग तज्ञांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक सत्रे घेतली. ज्यात त्यांनी आपल्या व्यवसायिक प्रवासाबद्दल सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉल्सला आकर्षक आणि व्यवस्थित सजवले होते. ज्यामुळे त्यांचे उत्पादन आकर्षक पद्धतीने ग्राहकांसमोर आणले जाऊ शकले.