भारताला जागतिक नेता बनवण्याची जबाबदारी तरूणांच्या खांद्यावर

पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामानातील लवचिकतेसाठी कार्य करत असताना युवा शक्तीने हरित आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी नेतृत्व केले पाहिजे.

भारताला जागतिक नेता बनवण्याची जबाबदारी तरूणांच्या खांद्यावर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि उद्योजकीय महत्त्वाकांक्षा जोपासण्यावर भर देऊन सरकार आजच्या तरुणांना उद्याचा प्रगतीशील भारत (Progressive India)घडवण्यासाठी तयार करत आहे. भारतातील तरुण चैतन्यपूर्ण आणि दृढनिश्चयी आहेत आणि भारताला जागतिक नेता बनवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे,असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav)यांनी मुंबईत केले.

मुंबईतील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM's) नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) येथे ‘विकसित भारतासाठी युवा शक्ती’ या कार्यक्रमात भूपेंद्र यादव बोलत होते. यावेळी विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष आणि कुलपती अमरीश पटेल ,एनएमआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रमेश भट आदी उपस्थित होते. 

भूपेंद्र यादव म्हणाले, पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामानातील लवचिकतेसाठी कार्य करत असताना, युवा शक्तीने हरित आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी नेतृत्व केले पाहिजे,”  भारताचे शाश्वत भविष्य उजळून टाकणाऱ्या तरुण ऊर्जेचे एका शक्तिशाली शक्तीमध्ये रूपांतर करणे हे सरकारचे ध्येय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भूपेंद्र यादव यांनी 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जनासाठी सरकारच्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकताना, त्यांनी कार्बन फूटप्रिंट कमी करणाऱ्या आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या उपायांची अंमलबजावणी करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. नागरिकांनी एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपासून दूर राहण्याचे, तसेच प्लास्टिकचा जबाबदारीने वापर करण्याचे आणि स्वयंशिस्तीची मानसिकता अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. तरुणांचा सहभाग भारताच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी तरुणांना शाश्वत पद्धतींसाठी समर्पित राहण्यासाठी प्रोत्साहित केले. 

"आम्ही एनएमआयएमएसमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना समृद्ध आणि शाश्वत राष्ट्र निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी वचनबद्ध आहोत", असे एनएमआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रमेश भट यांनी स्वागतपर भाषणात सांगितले. श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष आणि कुलपती अमरीश पटेल यांनी त्यांच्या वृक्षारोपण उपक्रमाद्वारे पर्यावरण आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल या कार्यक्रमात माहिती दिली.