छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रीय चारित्र्य घडवले : प्रा. नितीन बानगुडे पाटील
भारताच्या शास्वत विकासासाठी महाराजांचे विचार प्रेरणादायी आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी जो राज्यकारभार केला तो मुल्यांवर आधारित राज्यकारभार केला.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठेची, अपार श्रद्धेची आणि राष्ट्रासाठी जीवाची बाजी लावणारी माणसे कमविली. त्यातूनच राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचं कठीण कार्य महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने करून दाखविले. जगातील कोणतीही राष्ट्र निष्ठा, त्याग आणि समर्पणातूनच बनत असते . ह्याच निष्ठा, त्याग आणि समर्पण भावनेतून स्वराज्य निर्माण करत छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रीय चारित्र्य घडवले,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इरावरी कर्वे संकुलातील सभागृहात श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात नितीन बानगुडे पाटील बोलत होते. कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या वेळी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) ज्योती भाकरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य आदी मान्यवरांसह शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
नितीन बानगुडे पाटील म्हणाले, भारताच्या शास्वत विकासासाठी महाराजांचे विचार प्रेरणादायी आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी जो राज्यकारभार केला तो मुल्यांवर आधारित राज्यकारभार केला. लोकसहभाग, लोकशिक्षणावर जास्त भर देत स्त्रियांचा सन्मान, लिंग समानता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये स्वराज्यात रुजविली. महाराजांमध्ये विलक्षण जिज्ञासा होती. लोकमनामध्ये ज्ञान प्रवाहित झाले पाहिजे, ज्ञान प्राप्त होऊन त्यांच्यामध्ये जिज्ञासा वाढली पाहिजे, यासाठी त्यांनी स्वराज्यात ग्रंथनिर्मितीवर भर देत प्रचंड ग्रंथनिर्मिती केली.
महाराजांनी गड, किल्ले बांधताना कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची पूर्णतः काळजी घेतली होती. पर्यावरण संरक्षणही राष्ट्राच्या विकासासाठी महत्वाची मानली जातात. म्हणून वनसंवर्धनाला त्यांनी स्वराज्यात अतिशय महत्व दिले होते. रयतेचा विकास साधण्यासाठी स्वच्छ मुलकी प्रशासनाला महत्व दिले. तसेच रयतेमध्ये प्रत्येकांच्या हाताला काम देत त्यांनी अर्थव्यवस्था बळकट केली. आजच्या आधुनिक युगातील गुप्तहेर यंत्रणा ज्या आहेत त्या महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणास आपले आदर्श मानतात. शहाजी राजांनी स्वराज्याचे जे ध्येय, स्वप्न पाहिले ते प्राप्त करण्याचा,मिळविण्याचा आत्मविश्वास शिवबांमध्ये निर्माण केला आणि त्यांनी तो त्यांच्या मावळ्यांमध्ये निर्माण करून विश्ववंदनीय स्वराज्य निर्माण केले.