विद्यापीठातील मेस चालकाची हकालपट्टी; कुलसचिवांची घोषणा 

विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कटीबद्ध असून त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. तसेच मेस व उपहारगृहातील अन्न पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी  विद्यार्थी व प्राध्यापकांची समिती तीन दिवसात स्थापना केली जाईल,

विद्यापीठातील मेस चालकाची हकालपट्टी; कुलसचिवांची घोषणा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) मुला-मुलींच्या वसतीगृहातील मेस मधील जेवणात सातत्याने झुरळ,अळी  निघत असल्याने मंगळवारी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार (Registrar of the University Dr. Prafulla Pawar) यांनी मेस चालकाची हकालपट्टी mess करण्याचा निर्णय घेतला. त्याचाप्रमाणे विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कटीबद्ध असून त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. तसेच मेस व उपहारगृहातील अन्न पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी  विद्यार्थी व प्राध्यापकांची समिती तीन दिवसात स्थापना केली जाईल,अशीही ग्वाही पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिली. 

हेही वाचा : शिक्षण UGC India : आता ‘युजीसी’चे प्रत्येक महत्वाचे अपडेट मिळणार थेट तुमच्या मोबाईलवर

विद्यापीठातील मुलांच्या वसतीगृह क्रमांक 8 मधील  मेसच्या जेवणात सोमवारी रात्री झुरळ सापडल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी मेस बंद पाडली. तसेच मेस चालकांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने मेसला टाळे ठोकून सील लावले. त्यानंतर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास एनएसयुआय व राष्ट्रवादी कॉग्रेसने कुलगुरू कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. तसेच विद्यापीठ प्रशासना विरोधात घोषणा दिल्या. अळी नको जेवण द्या, झुरळ नको जेवण द्या ,अशी मागणी केली. त्यावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.

पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण देणाऱ्या व्यक्तीला विद्यापीठात थारा दिला जाणार नाही. संबंधित मेस चालकाची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन दिवसात मेस कमिटी नियुक्त केली जाणार असून त्यात विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश केला जाईल. मेस बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार स्वयंसेवी संस्थेला सकाळी व सायंकाळी असे दोन वेळा मोफत मसाले भात उपलब्ध करून देण्याबाबत पत्र पाठवले जाईल.