'धृतराष्ट्रा'च्या भुमिकेतील सरकारने बेरोजगार तरुणांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा..
बेरोजगारीबाबत नेहमीच ‘धृतराष्ट्रा’च्या भुमिकेत असेलेल्या महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले नाही तर राज्यातील तरूणांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात वाढलेली बेरोजगारी सरकारच्या नाकर्तेपणाचे जळजळीत प्रतीक आहे. त्यामुळे सरकारचा रोजगारनिर्मितीचा (Employment generation) दावा फुसका बार असल्याचे पुण्यातील एका कंपनीत नोकरी मिळावी म्हणून लागलेल्या लांबच्या लांब रांगांमुळे सिद्ध झाले आहे. बेरोजगारीबाबत (Unemployed youth) नेहमीच ‘धृतराष्ट्रा’च्या भुमिकेत असेलेल्या महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले नाही तर राज्यातील तरूणांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा काँग्रेसनेते सतेज पाटील (Congress leader Satej Patil) यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील बेरोजगारीची भयानक समस्या ही सरकारच्या धोरणात्मक अपयशाचे ठळक उदाहरण असून नोंदणीकृत बेरोजगारांचा आकडा हा राज्यातील युवकांना सन्मानजनक रोजगारांच्या संधीपासून दूर ठेवले जात असल्याचे ओरडून सांगत असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
नुकत्याच पुण्यात आयटीच्या जॉबसाठी लागलेल्या रांगेनंतर बेरोजगारासंदर्भात चर्चा जोरात सुरू झाली असून, राज्यातील २४ लाख ५१ हजार लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टलवर नोंदणी केल्याचा डेटा समोर आला आहे. केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा या पोर्टलवर महाराष्ट्रातील लोकांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जाची आकडेवारी देण्यात आली आहे.
या आकडेवारीनुसार जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, नाशिक, नांदेड आणि अमरावती या जिल्ह्यांतील नोकरी मिळवण्यासाठी नोंद केलेल्या बेरोजगार तरुणांची संख्या १ लाखाच्या पुढे आहे. एआयमुळे आयटी सेक्टरमधील जॉब जात असल्याची ओरड होत असतानाच महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक जणांनी या क्षेत्रात नोकरीसाठी नोंद केली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या केवळ सात महिन्याच्या काळात देशात २ कोटी ३९ लाख लोकांनी रोजगारासाठी नोंद केल्याचे सरकारी पोर्टलद्वारे समोर आले आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील संख्या १९ लाख ४० हजार आहे. डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील ही रोजगार इच्छुकांची संख्या वाढून २४ लाख ५१ हजारांवर गेली आहे. त्यातही सर्वाधिक नोंदणी एकट्या ऑक्टोबर महिन्यात झालेली दिसते. महाराष्ट्रातील या साडेचोवीस लाख जणांमध्ये ७ लाख ७७ हजार लोक हे १२ वी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले आहेत. २ लाखांहून अधिक जणांनी पदवी तर ३८ हजार जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. अशा तरुणांना देखील नोकरी मिळत नसेल तर देशासह राज्याचे भयावह वास्तव समोर येताना दिसत आहे.