लागा तयारीला : पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरू होणार; शालेय शिक्षणमंत्री
राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णयांची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरू केली जाणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर शासकीय शाळांमध्ये अभ्यासक्रम (CBSE syllabus applicable) राबवला जाईल. त्याबाबत असलेले गैरसमज दूर केले जातील, शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णयांची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरू (Teacher recruitment Start) केली जाणार आहे. काही संस्थांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ लागत असल्याने शिक्षक भरतीसाठी वेळ वाढवून दिल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Education Minister Dada Bhuse) म्हणाले.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नुकतीस राज्यातील पहिल्याच्या वर्गासाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातून टीकेची झोड उडाल्यानतंर त्यांनी या अभ्यासक्रमाविषयी असलेले गैरसमज दूर करणार असल्याचे मत व्यक्त केले. अधिवेशनातच त्याची सर्व माहिती दिली जाईल. त्यानंतर या अभ्यासक्रमाचे सर्वच स्तरांवरून स्वागत होईल, असा दावा भुसे यांनी केला.
सीबीएसई आले म्हणजे बालभारती स्टेट बोर्डाचे अस्तित्व संपेल, असे काही नाही. त्यांच्या अभ्यासक्रमातील काही भाग आपण घेणार आहोत. आपला इतिहास आणि भूगोल आपण कायम ठेवणार आहोत. पालकांच्या माहितीसाठी येत्या दोन दिवसांत विधानसभेत त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल. यंदाच्या वर्षी पहिलीसाठी हा अभ्यासक्रम सुरू करणार असून, तीन वर्षांत १२ वीपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल.