वैयक्तिक, व्यावसायिक वाढीसाठी विद्यार्थी- शिक्षक देवाणघेवाण आवश्यक: डॉ.रेणू शोम

पुण्यातील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे २६ वे “कै. प्राचार्य डॉ. बी. एस. भणगे स्मृती आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषदेचे” आयोजन महाविद्यालयाच्या नेविल वाडिया सभागृहात करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन डॉ.शोम यांच्या हस्ते करण्यात आले.

वैयक्तिक, व्यावसायिक वाढीसाठी विद्यार्थी- शिक्षक देवाणघेवाण आवश्यक: डॉ.रेणू शोम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे व्यवसाय प्रक्रियांचे व्यापक परिवर्तन आणि शाश्वतता हे खूप मोठ्या प्रमाणात एकमेकांशी जोडलेले आहेत. जागतिक स्तरावर व्यवसाय विकास करण्यासाठी सांस्कृतिक अभिमुखता, व्यावसायिक प्रशिक्षण, जागतिक जागरूकता, आंतरसांस्कृतिक समज, बहुभाषिकता असणं आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी विद्यार्थी आणि शिक्षक देवाणघेवाण कार्यक्रम(student and teacher exchange program) महत्त्वाचे असल्याचे मत कौन्सिल फॉर युरोपियन चेंबर ऑफ कॉमर्स (भारत) च्या संचालिका डॉ. रेणू शोम (Dr. Renu Shome, Director of the Council for European Chamber of Commerce)यांनी व्यक्त केले.

पुण्यातील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे (Ness Wadia College of Commerce)२६ वे “कै. प्राचार्य डॉ. बी. एस. भणगे स्मृती आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषदेचे” आयोजन महाविद्यालयाच्या नेविल वाडिया सभागृहात करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन डॉ.शोम यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ.पराग काळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवोपक्रम व उद्योजक विकास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. देविदास गोल्हार, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश चौधरी, उपप्राचार्या जयश्री वेंकटेश, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, परिषदेचे समन्वयक डॉ. राजेश राऊत आणि डॉ. दिपक वायाळ उपस्थित होते. 

डॉ. काळकर म्हणाले, व्यवसायांचे डिजिटल परिवर्तन आणि स्वयंचलित तंत्रज्ञान हे व्यवसायवृद्धी, कार्यक्षमता सुधारणा आणि नाविन्यपूर्णतेला चालना देतात. या तंत्रज्ञानामुळेच ई-कॉमर्स बाजारात वेगाने वाढ होताना दिसत आहे.

प्रा. डॉ. गोल्हार नवउद्योगाबाबत बोलताना म्हणाले, पारंपारिक व्यवसायांपेक्षा नव-उद्योगांना (स्टार्टअप) कमी भांडवलाची तसेच जागेची आवश्यकता असते. नवऊद्योजकांचा स्पष्ट आणि तांत्रिक दृष्टिकोन या साठी महत्त्वाचा आहे. नवऊद्योग यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारच्या नवोपक्रमांवर अवलंबून असल्याचे मत गोल्हार यांनी या वेळी व्यक्त केले. 

या परिषदेचे उद्दिष्ट जागतिक दृष्टिकोनातून व्यवसाय वातावरणातील उदयोन्मुख प्रवृत्तींची चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणणे हे असल्याचे प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

परिषदेच्या तांत्रिक सत्रात वेदांत अहलुवालिया, सुहास पटवर्धन, डॉ. ऋषी कपाल आणि सनदी लेखापाल मैसमी शहा यांसारख्या उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यवसायातील आर्थिक आणि तांत्रिक आव्हानांवर सखोल चर्चा केली. 

या परिषदेसाठी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, अमिटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव बन्सल, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. डी. लॉरेन्स यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तद्वतच मध्यवर्ती विद्यापीठ कर्नाटक, धारवाड चे निबंधक अधिकारी डॉ. आर. आर. बिरादार यांच्या " विकसित भारतासाठी व्यावसायिक पर्यावरण @ २०४७: आत्मनिर्भरतेकडे वाटचाल" या विषयावर मार्गदर्शन झाले.  

या कार्यक्रमात डॉ. बी.एस. भणगे यांचे चिरंजीव डॉ. अशोक भणगे उपस्थित होते. 

दोन दिवसीय परिषदेचा समारोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. एस. एन. पठाण यांच्या मार्गदर्शनाने झाला.