केवळ ३५० पदवीधर आणि ७० पदव्युत्तर विद्यार्थी असलेले राज्य ; पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आले चर्चेत 

अनेक वर्षांपूर्वीपर्यंत लक्षद्वीपच्या सर्व ३६ बेटांवर मशिदींशी संलग्न शाळांमध्ये कुराण शिकवले जात होते.

केवळ ३५० पदवीधर आणि ७० पदव्युत्तर विद्यार्थी असलेले राज्य ; पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आले चर्चेत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारताच्या लक्षद्वीप (Lakshadweep) या केंद्रशासित प्रदेशाबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा (Prime Minister Narendra Modi's visit), पर्यटन स्थळ असलेल्या मालदीवच्या मंत्र्यांनी (Minister of Maldives) मोदींच्या लक्षद्वीपच्या  प्रमोशनवर केलेली आक्षेपार्ह टिप्पणी, यामुळे सध्या लक्षद्वीप बरेच चर्चेत आले आहे. पण हा केंद्रशासित प्रदेश फक्त बेट किंवा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध नसून या क्षेत्राचे एक वेगळे शैक्षणिक वैशिष्ट्य देखील आहे. ते म्हणजे सध्या या राज्यात फक्त ३५० च्या आसपास  पदवीधर, ७०  पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी , १२० अभियंते आणि फक्त ९५ डॉक्टर आहेत. विशेष म्हणजे सुमारे ७० हजार लोकसंख्या असलेल्या या प्रदेशाचे साक्षरतेचे प्रमाण मात्र ८४ टक्के आहे.

लक्षद्वीपच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षांपूर्वीपर्यंत लक्षद्वीपच्या सर्व ३६ बेटांवर मशिदींशी संलग्न शाळांमध्ये कुराण शिकवले जात होते. मदरशांमध्ये मल्याळम भाषा ,अरबी लिपीत शिकविली जात होती, परंतु, ही भाषा काही मोजकेच लोक लिहू आणि वाचू शकत होते. इंग्रजांनी येथे आपली सत्ता सुरू केली तेव्हा येथील शिक्षण अतिशय मागासलेले मानले जात होते. पण त्यानंतरही तिथे शाळा उघडण्यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत. गेल्या काही वर्षांत लक्षद्वीपचा साक्षरता दर १५ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा : शिक्षण महाराष्ट्राचा जीईआर वाढवण्यासाठी 'स्कूल कनेक्ट' उपक्रम ; उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांची विशेष मुलाखत

लक्षद्विपच्या आंद्रोत येथील किराक्काडा सय्यद मोहम्मद कोया हे एकमेव असे व्यक्ती होते. ज्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण झाले होती. लक्षद्वीपमध्ये १९४२ मध्ये ते पहिले पदवीधर झाले. यानंतर त्यांना त्या भागाचे जिल्हाधिकारी आणि सहविकास आयुक्तही करण्यात आले होते. १८८८ मध्ये मशिदीच्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी विशेष प्रशिक्षित शिक्षक जोडण्यात आले. यानंतर १८९५  मध्ये मदरशांशी संलग्न प्राथमिक शाळांमध्ये मल्याळम वाचू आणि बोलू शकणारे विद्यार्थी उपलब्ध करून देण्यात आले. शाळेतील प्रत्येक धडा मल्याळम आणि अरबी लिपीत लिहिला जात असे,  सुमारे २० वर्षांनंतर म्हणजे १९०४ मध्ये कासारगोड, केरळ येथील मॅपिला शिक्षकाला लक्षद्वीपला पाठवण्यात आले, ज्याद्वारे  १५ जानेवारी रोजी लक्षद्वीपच्या अमिनी येथे पहिली सरकारी शाळा उघडण्यात आली. या शाळेत फक्त भाषा आणि अंकगणित विषय शिकवले जात होते.

लोकांच्या विनंतीवरून १९११ मध्ये किलतान येथे आणखी एक प्राथमिक शाळा उघडण्यात आली . तसेच १९२५ मध्ये लक्षद्वीपमधील कदमत येथे अशीच शाळा उघडली. या शिवाय १९३३ मध्ये शिष्यवृत्ती योजनाही  सुरू झाली.  त्यावेळी पाचवी ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी ५ रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती. सध्या लक्षद्वीपमध्ये तीन वसतिगृहे वरिष्ठ माध्यमिक शाळांशी संलग्न आहेत. जी आंद्रोत, कदमट आणि कावरत्ती येथे आहेत. या सर्व उपायांमुळे बेटांमधील पदवीधर आणि तांत्रिक कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.