दहावी- बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी का वाढले ? बोर्डालाही समजेना, 17 नंबरच्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू

संख्या का वाढली ? या विचाराने राज्य मंडळाचे अधिकारीही चक्रावून गेले

दहावी- बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी का वाढले  ? बोर्डालाही समजेना, 17 नंबरच्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षांना (10th - 12th Exams) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ (Significant increase in the number of students) झाली आहे. त्यामुळे ही वाढ का झाली ? याचा शोध आता राज्य मंडळाकडून घेतला जात आहे. त्यातही यंदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी - NEP )अंमलबजावणीस सुरुवात झाल्यामुळे 17 नंबरचा अर्ज भरून विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत का? याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

राज्य माध्यमिक मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी / मार्च महिन्यात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. दरवर्षी इयत्ता बारावीसाठी साधारणपणे 14 लाख 60 हजार विद्यार्थी तर दहावीसाठी साधारणपणे 15 लाख 80 ते 85 हजार विद्यार्थी नोंदणी करतात. परंतु, यंदा 16 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सद्यस्थितीत इयत्ता दहावीसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील काही वर्षांच्या तुलनेत 25 हजारांनी वाढल्याचे दिसून येत आहे. तर बारावीचे 50 हजार विद्यार्थी वाढले आहेत.त्यामुळे ही संख्या का वाढली ? या विचाराने राज्य मंडळाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्राचा जीईआर वाढवण्यासाठी 'स्कूल कनेक्ट' उपक्रम ; उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांची विशेष मुलाखत

महाराष्ट्रासह  देशभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. एनईपी अंतर्गत पुढील काही वर्षात दहावी- बारावीला असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये बदल केले जाणार आहेत. त्याला अवधी असला तरी त्यांच्या धास्तीने 17 नंबरचा अर्ज भरून विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, याबाबतची तपासणी आता राज्य मंडळाने सुरू केले आहे.
--------------


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शाळा स्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती.  हेच विद्यार्थी आता इयत्ता बारावीत आले आहेत.त्यामुळे बारावी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. परंतु इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या का वाढली ?  याचे कारण शोधण्याचे काम अजूनही सुरू आहे. 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. त्यामुळे ही संख्या वाढली आहे का ?  याबाबतची माहिती घेतली जात आहे.

- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे