मेंढपाळाचा मुलगा ठरला कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस अधिकारी

बिरदेवने कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मेंढपाळाचा मुलगा ठरला कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस अधिकारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल (UPSC Results) नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत यंदा एकूण 1 हजार 9 उमेदवार यशस्वी झाले असून यात 725 पुरुष आणि 284 महिला आहेत. या परीक्षेत असा एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला जो इतरांना प्रेरणा देणारा आहे. बिरदेव सिध्दाप्पा डोणे (रा. यमगे ता. कागल, जि. कोल्हापूर) (Birdev Siddappa Done) असे त्याचे नाव असून तो एक मेंढपाळाचा मुलगा आहे.  

घरात कोणतीच सुविधा नसताना बिरदेवने या परीक्षेत 551 वी रँक मिळवली असून आताही निकाल लागला. त्यावेळी तो बेळगाव परिसरात बकरी चारण्यामध्ये व्यस्त होता. घरात शिक्षणाचं वातावरण नसलं तरी पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागले. त्याने संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे.

शाळेचा व्हरांडावर अभ्यास

बिरदेवने लहान वयापासूनच अधिकारी व्हायचं असं पक्क ठरवलं होतं. त्या दृष्टीने त्याचा अभ्यास देखील सुरु होता. पण दोन खोलीचं घर असल्यामुळे त्याला अभ्यास करायला जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे तो गावातील मराठी शाळेचा व्हरांड्यात अभ्यास करायचा. त्याने त्याच्या गावातच प्राथमिक व  माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय.पी.एस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते. बारावी विज्ञान शाखेत ही त्याने चमकदार कामगिरी करत ८९ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर त्याने पुणे सी.ओ.इ.पी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. 

दोन परीक्षांमध्ये अपयश मात्र न खचता तिसऱ्या प्रयत्नात उज्वल यश

सुरुवातीपासूनच बिरदेवला स्पर्धा परीक्षा देण्याचे वेड होते. सुरुवातीच्या काळात त्याने दोन वर्षे दिल्ली मध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC ) परीक्षेची तयारी सुरु केली. त्यानंतर त्याने पुन्हा पुण्यात परतून सदाशिव पेठ येथे अभ्यास सुरु केला. त्याने आतापर्यंत दोन वेळा ही परीक्षा दिली होती पण त्याला यश मिळाले नाही. मात्र यातूनही तो खचला नाही त्याने जिद्दीने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि यामध्ये उज्वल यश मिळवत देशात ५५१ वी रँक मिळवली. 

कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस अधिकारी

बिरदेवने कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय सोशल मीडियावर ‘कागलचा अभिमान बिरदेव’ अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. बिरदेवच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबियांचे देखील कौतुक होताना दिसून येत आहे.