विमलाबाई गरवारे प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात
संपूर्ण शाळेत दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत शिक्षक दिन उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी यावेळी आगळावेगळा आणि अभिनव उपक्रम राबविला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षकांची भूमिका स्वीकारत विविध विषयांचे अध्यापन केले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने अध्यापनाची जबाबदारी पार पाडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी, जबाबदारीची जाणीव तसेच प्रभावी संवादकौशल्य यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, सेवक आणि सुरक्षारक्षक अशा विविध पदांच्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील विविध घटकांच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेता आला. तसेच शालेय व्यवस्थापनामध्ये प्रत्येक पदाची भूमिका आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.
संपूर्ण शाळेत दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे शिक्षकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध भूमिका आणि त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी कौतुक केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवातून शिकण्याचा, तर शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा अभिमान वाटावा असा संस्मरणीय ठरला.