SPPU News : भाजपच्या आंदोलनादरम्यान राडा; दोन मुलींसह चार विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने पेटला वाद

विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असताना काही संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्या दिशेने घोषणा देत आले.

SPPU News : भाजपच्या आंदोलनादरम्यान राडा; दोन मुलींसह चार विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने पेटला वाद
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) शुक्रवारी विद्यापीठात निषेध मोर्चा (BJP Protest) काढण्यात आला. यादरम्यान काही विद्यार्थी  संघटनांचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे विद्यापीठात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी (Pune Police) दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

 

पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला. विद्यापीठात  संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या  वसतिगृहातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याची घटना समोर आली. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी विद्यापीठात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

SPPU News : वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर; विद्यापीठाकडून गंभीर दखल

 

विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असताना काही संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्या दिशेने घोषणा देत आले. त्यामुळे या ठिकाणी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले. विद्यापीठ आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजप कार्यकर्ते व विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांमधील वाद विकोपाला जाऊन अनर्थ होऊ नये म्हणून उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना घेराव घातला. तसेच त्यांना ताब्यात घेतले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी  भारतीय जनता पक्षातर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस तपास करत असून विद्यापीठात निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k