उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने घेतला मोकळा श्वास ; कार्यालयाचे स्थलांतर

विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थांचालक यांना आता उच्च शिक्षण विषयक कामासाठी मॉडेल कॉलिनी येथे यावे लागणार आहे.

उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने घेतला मोकळा श्वास ; कार्यालयाचे  स्थलांतर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सुमारे तीन दशकापासून सेंट्रल बिल्डिंगमध्ये दाटीवाटीत सुरू असलेले राज्याचे उच्च शिक्षण संचालक कार्यालय (Higher Education Director Office) सोमवारपासून स्थलांतरित (Relocation) झाले .त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थांचालक यांना आता उच्च शिक्षण विषयक कामासाठी मॉडेल कॉलिनी येथे यावे लागणार आहे.संचालक कार्यालयाला स्वतंत्र व प्रशस्त इमारत प्राप्त झाल्याने कामात वेग येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : शिक्षण राज्यातील प्राध्यापिका बनणार ‘महिला सक्षमीकरण दूत’

नूतनीकरण करून कार्यालयीन वापरासाठी आवश्यक असलेल्या सुविधांसह सुसज्ज असलेल्या इमारतीचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले.यावेळी राज्याचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी,प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे,  सीओईपी टेक्नॉलॉजीकल युनिव्हार्सिटीचे कुलगुरू डॉ. सुधीर आगाशे, गोखले इस्न्टिटयूटचे डॉ. अजित रानडे , माजी कुलगुरू डॉ.आर. एस. माळी आदी उपस्थित होते. 

पुणे विभागीय शिक्षण तंत्र शिक्षण विभागाचे कार्यालय व विभागीय तंत्र शिक्षण मंडळाच्या कार्यालयाचे स्थलांतर एमएसबीटीच्या नव्या इमारतीत झाले आहे.परिणामी या कार्यालयाची जुनी इमारत रिकामी झाली आहे.त्यामुळे या कार्यालयाच्या रिक्त जागेत राज्याचे उच्च शिक्षण संचालक स्थलांतरिक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता उच्च शिक्षण संचालनालाय, ४१२, ई, बहिराट पाटील चौक , मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर , पुणे ४११०१६ येथे हलवण्यात आले आहे.

सेंट्रल बिल्डिंगमधील जागेत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, राज्याचे  उच्च शिक्षण सहसचालक डॉ.प्रकश बॅच्छाव , कार्यालय प्रमुख, कक्षाधिकारी व कर्मचारी यांना बसण्यासाठी प्रशस्त जागा नव्हती . राज्यभरातून विविध कामांसाठी आलेल्या व्यक्तींना सुध्दा बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांना उभे राहावे लागत होते. विविध कार्यालये लहान लहान खोल्यांमध्ये कोंदाट वातावरणात सुरू होती. मात्र, कार्यालय स्वतंत्र इमारतीत स्थलांतरीत झाल्याने सर्वांना प्रशस्त व मोकळी जागा मिळली आहे.त्याच प्रमाणे राज्य भरातील विद्यापीठ व महाविद्यालयांशी निगडीत कागदपत्रे ठेवणे सहज शक्य होणार आहे.त्यामुळे उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला असल्याचे बोलले जात आहे.