इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमासाठी विक्रमी नोंदणी अर्ज, यंदा प्रवेशासाठी चुरस वाढणार

जिनिअरिंग, फार्मसी, कृषी यांसारख्या अभ्यासक्रमाकडे यंदा विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे.२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ७ लाख ६४ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरले आहेत. त्यामुळे यंदा सर्वच प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच मेरिट लिस्ट देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमासाठी विक्रमी नोंदणी अर्ज, यंदा प्रवेशासाठी चुरस वाढणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Examination) घेण्यात येणाऱ्या  इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी यांसारख्या अभ्यासक्रमाकडे (Engineering, Pharmacy, Agriculture courses) यंदा विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे. मागील चार वर्षाच्या तुलनेत यंदा या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या विक्रमी अर्जाची नोंदणी (Registration of student record applications) झाली आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ७ लाख ६४ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरले आहेत. त्यामुळे यंदा सर्वच प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच मेरिट लिस्ट देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा सीईटी सेलने या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी डिसेंबरमध्येच नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये एमएचटी-सीईटी  परीक्षेसाठी ३० डिसेंबरला नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत २८ फेब्रुवारीला संपली. त्यानुसार यंदा एमएचटी-सीईटीसाठी राज्यभरातून ८ लाख ९४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे शुल्क भरून नोंदणी अंतिम केली आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वाधिक नोंदणी आहे. 

गेल्यावर्षी ७ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार ५९५ ने वाढली आहे. यातील गेल्या वर्षी प्रत्यक्षात ६ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी परीक्षा दिली होती. २०२१-२२ मध्ये ५ लाख ५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. तर २०२२-२३ मध्ये ६ लाख ६ हजार ७९० विद्यार्थी अर्ज, २०२३-२४  मध्ये ६ लाख ३६ हजार ८०४, २०२४-२५ मध्ये ७ लाख २५ हजार ७७३ तर यंदा २०२५-२६ साठी ७ लाख ६४ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. हा आत्तापर्यंतच्या विक्रमी नोंदणीचा आकडा आहे. 

एमएचटी-सीईटी परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यानुसार पीसीबी ग्रुपची एमएचटी-सीईटी परीक्षा ९ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे, तर पीसीएम ग्रुपची एमएचटी-सीईटी परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान होणार आहे, असे सीईटी सेलने जाहीर करण्यात आले आहे. यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक असे ४ लाख ६३ हजार अर्ज फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचा ग्रुप असलेल्या सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी भरले आहेत, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजी या विषयांच्या ग्रुपची सीईटी देण्यासाठी तीन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.