MPSC : प्रोफाईल आधार KYC करा; आयोगाच्या उमेदवारांना सूचना 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार, उमेदवारांना आधार ऑनलाईन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी, नॉन आधार ऑफलाईन केवायसी या पद्धतीतून ओळख पडताळणी करावी लागणार आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रमणालीमध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्या उमेदवाराला भ्रमणध्वनी तसेच ईमेल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

MPSC : प्रोफाईल आधार KYC करा; आयोगाच्या उमेदवारांना सूचना 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या अर्ज प्रणालीमधील खात्याची आधार व इतर पद्धतीने 'केवायसी' करणे अनिवार्य असणार आहे. प्रत्येक अर्ज भरण्यापूर्वी जर उमेदवाराने 'केवायसी' पडताळणी (Profile Aadhaar KYC) केली नाही, तर त्याला अर्ज भरता येणार नाही. यासंदर्भात 'एमपीएससी'ने उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्धीपत्रक जाहीर (Press release issued) केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार, उमेदवारांना आधार ऑनलाईन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी, नॉन आधार ऑफलाईन केवायसी या पद्धतीतून ओळख पडताळणी करावी लागणार आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रमणालीमध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्या उमेदवाराला भ्रमणध्वनी तसेच ईमेल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आधार आधारित ओळख पडताळणीच्या व्यवस्थेमुळे आधार क्रमांकाशी संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरविण्यात आले आहे.

अर्ज करण्याकरीता संबंधित उमेदवाराला प्रथम आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर विहित पध्दतीने एक वेळची नोंदणी करावी लागते. तसेच विहित पध्दतीने नोंदणीनंतर संबंधित खात्यामध्ये अर्हतेसंदर्भातील विविध प्रकारचा तपशील नोंदवावा लागतो. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांच्या ओळख पडताळणीकरीता उमेदवारांच्या खात्यामध्ये आधार क्रमांक नोंदविण्याची पध्दती व सुविधा मार्च २०१७ पासून लागू करण्यात आली आहे.

भरती प्रक्रियांच्या विविध टप्प्यावर उमेदवाराचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वेच्छा तत्वावर आधार अधिप्रमाणीकरणाचा वापर करण्याकरीता विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मान्यता दिली आहे. तसेच, राज्य शासनाकडून भरतीप्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्याकरीता ई-केवायसी सेवांसाठी स्वेच्छा तत्वावर आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्यासाठी एमपीएससीला प्राधिकृत केले आहे.