सुट्टीत अनुभवाता येणार 'पुणे बाल पुस्तक जत्रा'
ही जत्रा २२ ते २५ मे या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे अनुभवता येणार आहे. त्यामध्ये बाळगोपाळांसमवेत पालक आणि शिक्षकांसाठीही नावीन्यपूर्ण कार्यक्रम, उपक्रम, परिसंवाद व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, खाऊगल्लीत मुलांना चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लागावी, इतिहास, कला, साहित्य व संस्कृतीची माहिती व्हावी आणि लेखन-आकलन कौशल्य वाढावे, या उद्देशाने पुणे बाल पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जत्रा २२ ते २५ मे या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे अनुभवता येणार आहे. त्यामध्ये बाळगोपाळांसमवेत पालक आणि शिक्षकांसाठीही नावीन्यपूर्ण कार्यक्रम, उपक्रम, परिसंवाद व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, खाऊगल्लीत मुलांना चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते.
पांडे म्हणाले, “राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने पुणे बाल पुस्तक जत्रा या विनामूल्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. या सुट्टीत मुलांना साहित्य-संस्कृतीची माहिती व्हावी; तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांची माहिती मिळावी. या माध्यमातून त्यांना साहित्याचा स्पर्श होऊन, भविष्यात ते चांगले वाचक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. ही प्रक्रिया हसत खेळत घडावी म्हणूनच जत्रेच्या माध्यमातून मुलांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.”
'या उपक्रमाला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. महापालिका सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील बल्लाळ आणि बालगंधर्व व्यवस्थापक राजेश कामठे यांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. या जत्रेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी,' असे राजेश पांडे यांनी सांगितले.
…….
बालपुस्तक जत्रेत काय-काय?
'मराठी बाल आणि कुमार साहित्याचे भव्य पुस्तक प्रदर्शनही होणार आहे. या जत्रेत किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बाल साहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, चिंटू तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ आणि प्रशिक्षण असे नावीन्यपूर्ण उपक्रम पूर्णपणे मोफत राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या मुलांसमवेत पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट देऊन साहित्य संस्कृतीचा अभिनव मेळा अनुभवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा,' असे आवाहन पांडे यांनी केले आहे.
-------------------------
खेळा अंगणातले खेळ
'आपले अंगण' उपक्रमात मुलांना देशी खेळाची धमाल मस्ती अनुभवायला मिळणार आहे. सागरगोट्या, विटी-दांडू, भोवरा, लगोरी, दोरीवरच्या उड्या, तळ्यात-मळ्यात, टायर रेस हे अंगणातले खेळ मुलांना खेळता येणार आहेत.
....
'मावळा खेळा'तून इतिहासाचा जागर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारा 'मावळा खेळ' अनुभवण्याची संधी बालगोपाळांना मिळणार आहे. या मैदानी खेळातून इतिहासाचा जागर होणार आहे.
....
मुलांना घडविण्यात पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे पालक आणि शिक्षकांसाठी बालसाहित्याचे सर्व भाषांमधील विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होते, नावीन्यपूर्ण उपक्रमांनी सजलेल्या जत्रेचा आनंद घ्यावा.
- राजेश पांडे, विश्वस्त, राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
………..
eduvarta@gmail.com