"पीआरएन ब्लॉक" विरोधात इनोव्हेशन फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी लढा
"पीआरएन ब्लॉक" झालेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने पाठपुरावा करण्यासाठी एक व्यापक अभियान राबविण्याचा निर्णय इनोव्हेशन फाउंडेशनने घेतला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
PRN BLOCK बाधित विद्यार्थ्यांची माहिती इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे गुगल फॉर्मद्वारे जमा केली जाणार असून त्याद्वारे विद्यापीठ, युजीसी व सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरून द्यावे, असे आवाहन कल्पेश यादव यांनी केले आहे.
"पीआरएन ब्लॉक" झालेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने पाठपुरावा करण्यासाठी एक व्यापक अभियान राबविण्याचा निर्णय इनोव्हेशन फाउंडेशनने घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत, शिक्षण अर्धवट राहिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पारिक्षेबाबतच्या माहितीची नोंद करण्यासाठी गुगल फॉर्म तयार केला आहे. ही माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केली जाणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही या संदर्भात याचिका दाखल करून लढा दिला जाणार आहे.यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेलले जाणार नाही. सर्व खर्च फाउंडेशन करणार आहे. विद्यार्थ्यांनी innovateyou.in/complete-your-degree या संकेतस्थळावर आपली माहिती भरावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थी सत्र पूर्ण करण्याच्या कालावधीत पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. परिणामी, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने त्यांचा पीआरएन क्रमांक ब्लॉक केला आहे. यामुळे विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होण्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा करून पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या होत्या, ज्यामुळे अनेक विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन रोजगाराच्या संधी मिळवू शकले.
मात्र, यावर्षी देखील हजारो विद्यार्थी या समस्येत अडकले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार, ठराविक कालावधीत विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, विद्यापीठ किंवा महाविद्यालयांकडून याबाबत विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न दिल्याने, अनेक विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. काही विद्यार्थ्यांचे केवळ अंतिम वर्ष बाकी असताना, ते परीक्षा अर्ज भरू शकत नाहीत, तर काहींचे फक्त प्रथम, द्वितीय किंवा तृतीय वर्षाच्या काही विषयांच्या परीक्षा बाकी आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकवर महिती भरल्यास पुढे त्याचा विद्यापीठ व युजीसीकडे पाठपुरावा करण्यासाठी उपयोग होईल. यावर कायमचा उपाय म्हणून धोरणात्मक निर्णयासाठी कोर्टात जाण्याची गरज पडल्यास ती फाऊंडेशनची तयारी आहे ' अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली आहे.
eduvarta@gmail.com