उत्तरपत्रिका तपासण्यास विद्यापीठाकडून उशीर का होतोय? गंभीर माहिती आली समोर

विविध परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तर पत्रिका परीक्षा विभागाच्या कस्टडीत ठेवल्या जातात. या उत्तरपत्रिका विद्यापीठाबाहेर पाठवून तपासता येत नाहीत.

उत्तरपत्रिका तपासण्यास विद्यापीठाकडून उशीर का होतोय? गंभीर माहिती आली समोर
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) परीक्षा विभागाकडून (Examination Department) उत्तर पत्रिका तपासण्याला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. परंतु, उत्तर पत्रिका तपासण्यासाठी परीक्षा विभागात महाविद्यालयांमधून प्राध्यापक (Professors) येत नाहीत. परिणामी रिचेकिंग व पुनर्रपडताळणीसाठी विलंब होतो. त्यामुळे आता महाविद्यालयामध्येच या उत्तरपत्रिका तपासण्यास पाठवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती परीक्षा विभागातर्फे कुलगुरू (Vice Chancellor) कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकन व पुनर्रपडताळणीसाठी परीक्षा विभागाकडे अर्ज केला जातो. परंतु, पुढील सत्राची परीक्षा तोंडावर आली तरी परीक्षा विभागाकडून हे निकाल उपलब्ध करून दिले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातो. मात्र, विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक येत नसल्याने हा विलंब होत असल्याचे परीक्षा विभागातील अधिकारी सांगत आहेत.

विद्यार्थ्यांच्या समस्या वेशीला टांगलेल्या! 'अभाविप'चा गंभीर आरोप, परीक्षा संचालकांच्या राजीनाम्यासाठी उपोषण

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ महेश काकडे म्हणाले, विविध परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तर पत्रिका परीक्षा विभागाच्या कस्टडीत ठेवल्या जातात. या उत्तरपत्रिका विद्यापीठाबाहेर पाठवून तपासता येत नाहीत. सध्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सध्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम केले जात आहे. तसेच अनेक महाविद्यालयांमध्ये 'नॅक' ची कामे सुरू आहेत.

प्राध्यापकांची रिक्त पदे भरा; आता युजीसी अध्यक्षांनीच लिहिले राज्यांना पत्र

त्यामुळे प्राध्यापक विद्यापीठात पुनर्मूल्यांकन व पुनर्रपडताळणी पडताळणीसाठी येत नाहीत. त्यामुळे या उत्तरपत्रिका विद्यापीठाबाहेर तपासणीसाठी पाठवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कुलगुरू कार्यालयाकडे करण्यात आली आहे. महाविद्यालयांमध्ये मान्यताप्राप्त प्राध्यापकांची संख्याच मुळात कमी आहे. विशेषतः विधी अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाचा निकाल लावण्यात अडचणी येत आहेत, असेही काकडे यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2