तंत्रशिक्षण 'शिका आणि कमवा' उपक्रमात बदल, आता विद्यार्थ्यांना उद्योग समूहांमध्ये काम
शासनाने 'शिका व कमवा' हा उपक्रम राबविण्याकरिता तयार करण्यात आलेल्या सर्वकष धोरणास मान्यता दिलेली आहे. या धोरणामध्ये नमूद अटी व शर्तीनुसार संबंधित संस्था व सहभागी उद्योगसमूहांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संबंधित उपक्रम राबविण्यात येणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) संलग्न संस्था आणि उद्योगसमूह यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी 'शिका व कमवा' ('Learn and Earn' initiative) उपक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी संस्था, विद्यार्थी आणि उद्योगसमूह यांना नोंदणी (Institution, Student and Industry Group Registration) करावी लागणार आहे. यातून विद्यार्थ्यांना थेट उद्योगसमूहांमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव उमेश नागदेवे (Secretary Umesh Nagdeve) यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, शासनाने 'शिका व कमवा' हा उपक्रम राबविण्याकरिता तयार करण्यात आलेल्या सर्वकष धोरणास मान्यता दिलेली आहे. या धोरणामध्ये नमूद अटी व शर्तीनुसार संबंधित संस्था व सहभागी उद्योगसमूहांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संबंधित उपक्रम राबविण्यात येणार आहे. 'शिका व कमवा' या उपक्रमांतर्गत संस्थेतील विविध अभ्यासक्रमांसाठी शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे.
'शिका व कमवा' या उपक्रमांतर्गत शासनाची मान्यता प्राप्त झालेल्या सर्व पालक संस्थांनी शासन निर्णयात नमूद सर्व अभ्याक्रमांकरिता, शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता 17 जूनपर्यंत तसेच उद्योगसमुह संस्थांनी 21 जूनपर्यंत मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून संलग्नता शुल्क व कागदपत्रांची पूर्तता करून संलग्नता घेणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उपक्रमात सहभागी होणार्या प्रत्येक उद्योगसमूहासाठी मंडळाकडून स्वतंत्र संलग्नता प्राप्त करून घेणेदेखील अनिवार्य आहे. संलग्नता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लिंक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
'शिका व कमवा' या उपक्रमाच्या धोरणामध्ये विद्यार्थी नोंदणी वर्षातून दोन वेळा करण्याची तरतूद आहे. त्यानुसार मंडळाने संबंधित नोंदणी ही प्रत्येक वर्षी जानेवारी व जून महिन्यांमध्ये करण्याचे निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून पूर्ण करणे गरजेचे असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
यावर्षी संचालनालयामार्फत ‘ई- कौन्सिलिंगची’ संकल्पना राबविण्यात येत असून नवीन तंत्रज्ञानावर आधारित ‘सेंटर ऑफ एक्सलन्सची’ स्थापनही करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी कुठे व कसा अर्ज सादर करावा, अभ्यासक्रमाचे स्वरूप कसे असणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कशाप्रकारे उपलब्ध होणार आहे, याचे मार्गदर्शन दिली जाणार आहे.
- डॉ. विनोद मोहितकर, संचालक तंत्र शिक्षण संचालनालय