आयआयटी बाॅम्बेच्या प्लेसमेंटमध्ये मोठी घट; 36 % विद्यार्थी नोकरीच्या प्रतिक्षेत.. 

आयआयटी बॉम्बेच्या 2000 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी सुमारे 712 विद्यार्थ्यांना या सत्रात अद्याप प्लेसमेंट मिळालेले नाही.

आयआयटी बाॅम्बेच्या प्लेसमेंटमध्ये मोठी घट; 36 % विद्यार्थी नोकरीच्या प्रतिक्षेत.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशाभरातील हजारो विद्यार्थ्यी आयआयटी (IIT) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नववी-दहावीपासून मेहनत घेऊन धडपडत असतात. त्यामगचा हेतू म्हणजे आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर करियर सेट होते. नोकरीसाठी इकडे तिकडे भटकंती करायची गरज लागत नाही. मात्र आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) एक वेगळेच चित्र दिसून येत आहे. आयआयटीकडूनही कॅम्पस प्लेसमेंट मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (Indian Institute of Technology, Bombay) च्या 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी (36% students are unemployed) मिळालेली नाही. हे सर्व विद्यार्थी मागील अनेक महिन्यापासून नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. 

सध्या आयआयटी बॉम्बेमध्ये प्लेसमेंट सुरू आहे, ज्यामध्ये देश-विदेशातील नामांकित कंपन्यांनी भाग घेतला आहे. प्लेसमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या तब्बल 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीच्या ऑफर मिळाल्या नसल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात नोकरीच्या समस्या तरुणांना भेडसावणार असल्याचे बोलले जात आहे.  

मीडिया रिपोर्टनुसार, आयआयटी बॉम्बेच्या 2000 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी सुमारे 712 विद्यार्थ्यांना या सत्रात अद्याप प्लेसमेंट मिळालेले नाही. आयआयटी बॉम्बेमध्ये सध्या प्लेसमेंटची प्रक्रिया सुरू आहे जी मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेला सर्वाधिक मागणी आहे. दरवर्षी या शाखेतील विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट मिळते. मात्र या शाखेतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या वर्षी आयआयटी बॉम्बेतील 32.8 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत. आतापर्यंत प्लेसमेंट मिळवू न शकलेल्या अशा विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोंदणीकृत 2,209 विद्यार्थ्यांपैकी 1,485 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे. अहवालात म्हटले आहे की आयआयटी-बॉम्बेच्या प्लेसमेंट सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक मंदीमुळे प्लेसमेंट सीझनसाठी कंपन्यांना कॉल करणे कठीण झाले आहे.