बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत दुसऱ्यांदा गोंधळ

पुण्यासह राज्यातील इतर केंद्रावरही या परीक्षेवर बहिष्कार घातला. तसेच काही विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचा दावा केला.

बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत दुसऱ्यांदा  गोंधळ

बार्टी, सारथी, महाज्योती (Barti  Sarathi Mahajyoti ) या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी आयोजित करण्यात आलेल्या फेलोशिप चाचणी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना दोन प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिल्याचे आढळून आल्याने संभ्रम निर्माण झाला. परिणामी विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यातील इतर केंद्रावरही या परीक्षेवर बहिष्कार घातला. तसेच काही विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचा दावा केला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा या परीक्षेत गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले.दरम्यान आता विद्यार्थ्यांकडून सरसकट फेलोशिपची मागणी केली जात आहे.

 बार्टी , सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशिप चाचणी परीक्षेच्या  आयोजनाची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडे देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात घेतलेल्या परीक्षेत 2019 च्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली गेली म्हणून ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. त्यानंतर 4 जानेवारी रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. सेट विभागाने प्रश्नपत्रिका छापायचे काम एका त्रयस्थ संस्थेला दिले होते. या संस्थेने ए आणि बी प्रश्नसंच छापून त्याला सील बंद करून दिले. परंतु, सी आणि डी हा प्रश्नसंच त्याने छपाई करून दिला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला सी आणि डी प्रश्नसंच स्वतः छापून घ्यावे लागले. छापलेल्या प्रश्नपत्रिका सील लावण्याची व्यवस्था विद्यापीठाकडे नसल्याने सी आणि डी हा प्रश्नसंच सील न लावता परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आले. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला पूर्ण कल्पना होती.

हेही वाचा : UGC NET डिसेंबर 2023 परीक्षेचा निकाल पुढे ढकलला ; आता निकाल 17 जानेवारीला

परीक्षा सुरू होण्यापूर्वी एखादी प्रश्नपत्रिका किंवा त्यातील काही प्रश्न परीक्षा केंद्राबाहेरील विद्यार्थ्यांना मिळाले तर पेपर फुटला, असे गृहीत धरले जाते. मात्र, तशा प्रकारचे पुरावे अद्याप प्राप्त झाले नाहीत. काही विद्यार्थ्यांना सीलबंद प्रश्नपत्रिका तर काही विद्यार्थ्यांना सील नसलेली प्रश्नपत्रिका का दिली गेली,असा  प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला याचा खुलासा करावा लागणार आहे. तसेच या परीक्षेत एकदा नाही तर दोनदा गोंधळ झाला आहे. 3 हजार 475 विद्यार्थीच ही परीक्षा देणार आहेत. विद्यापीठाच्या सेट विभागाने महाराष्ट्र व गोवा राज्यातील सुमारे एक ते सव्वा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा यापूर्वी आयोजित केली आहे. त्यामुळे केवळ 3 हजार 475 विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाला सेट विभागाला आयोजित करता येत नाही का ? असाही प्रश्न निर्माण होतो.

दरम्यान,बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीने 10 जानेवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या फेरशिप चाचणी परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. सीलबंद प्रश्नपत्रिका आणि सील बंद नसलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या यावरून परीक्षा केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. आता पुन्हा एकदा फेलोशिपसाठी परीक्षा घेणार की संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
--------------------
विद्यापीठाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना सील बंद प्रश्नपत्रिका व सील नसलेल्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पाठविल्या जात असल्याबाबत पूर्ण कल्पना होती. प्रश्नपत्रिका छपाई करून देणाऱ्या एजन्सीकडून ए आणि बी प्रश्नपत्रिका संच छापून बंद असलेल्या अवस्थेत मिळाल्या. सी व डी प्रश्नसंच विद्यापीठाला छापून घ्यावे लागले. पेपर सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणे याला पेपर फुटला, असे म्हणतात. परीक्षा केंद्रावर दोन वेगळ्या स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका दिल्या म्हणजे पेपर फुटला, असे म्हणता येणार नाही.
 - बाळासाहेब कापडणीस, समन्वयक, सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ