पुण्यातील आणखी एक नामांकित महाविद्यालय होणार स्वायत्त... 

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाने स्वायत्तता मिळण्यासाठी अर्ज केला असून पुढील काही दिवसात विद्यापीठ अनुदान आयोगाकडून त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील आणखी एक नामांकित महाविद्यालय होणार स्वायत्त... 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील (Pune city)बहुतांश सर्व नामांकित महाविद्यालये स्वायत्त (Recognized Colleges Autonomous)झाली असून त्यात आणखी एका महाविद्यालयाचा समावेश होणार आहे.परिणामी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न (Affiliated to Savitribai Phule Pune University)स्वायत्त महाविद्यालयांची संख्या 50 च्या असापास जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना वाणिज्य विद्याशाखेशी (Faculty of Commerce)संबंधित नवनवीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत.नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाने (Ness Wadia College of Commerce)स्वायत्तता मिळण्यासाठी अर्ज केला असून पुढील काही दिवसात विद्यापीठ अनुदान आयोगाकडून त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

पुणे शहरातील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न फर्ग्युसन महाविद्यालय,मॉडर्न महाविद्यालय शिवाजी नगर, मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड,स.प.महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय अशी अनेक नामांकित महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत.पुण्यासह,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये सुध्दा स्वायत्त झाली असून दिवसेंदिवस स्वायत्त महाविद्यालयांची संख्या वाढतकच चालली आहे.त्यात आता नेस  वाडिया महाविद्यालयाने काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाकडे स्वायत्तेसाठी अर्ज केला होता. विद्यापीठाने सर्व कार्यवाही पूर्ण करून महाविद्यालयाला स्वायत्तता देण्याबाबतचा प्रस्ताव शिफारशीसह विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवला आहे.विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या नेस वाडिया महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागतात. महाविद्यालयातील तज्ञ ,अभ्यासू व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना सातत्याने अनोख्या पध्दतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.स्वायत्तता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षांपासून उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. 
-----------------------------------------------

नेस वाडिया कॉमर्स महाविद्यालयाने स्वायत्तता मिळण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयाला लवकरच स्वायत्तता मिळेल,अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील काळात महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे शक्य होईल.तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा या अभ्यासक्रमांचा लाभ घेता येईल. 

- डॉ. वृषाली रणधीर, प्राचार्य,नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे