अंगणवाडी सेविकांचे आंदोलन स्थगित;  ग्रॅज्युएटी,पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव

महिला बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे अंगणवाडीच्या राज्य आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या बैठकीतून ही फलनिष्पत्ती झाली.

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन स्थगित;  ग्रॅज्युएटी,पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अंगणवाडी सेविका आणि मदतीस (Anganwadi workers and helpers) यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याचा तसेच त्यांच्या पेन्शन विषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचा मुख्य निर्णय घेण्यात आला त्यानंतर अंगणवाड्यांचे बंद आंदोलन स्थगित (Anganwadi bandh movement suspended) करण्यात आला आहे. गेले 52 दिवस सुरु असलेला हा बंद मागे घेण्यासाठी शासनाबरोबर अनेक बैठका झाल्या.त्यानंतर महिला बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे अंगणवाडीच्या राज्य आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या बैठकीतून ही फलनिष्पत्ती झाली,असे अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार (Nitin Pawar, Regional Vice President of Anganwadi Karma Sabha Maharashtra)यांनी सांगितले.

शासनाबरोबर झालेल्या बैठकांमध्ये शासन पेन्शन आणि ग्रॅज्युएटी देण्याविषयी टोलवाटोलवी करत होते.मागील बैठकीत याविषयी आम्ही केंद्र सरकारकडे मार्गदर्शन मागवले आहे,असे सांगून विषय टाळायचा ही प्रयत्न करण्यात आला होता. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी चिवटपणे बंद व विविध आंदोलने सुरू ठेवली होती .सरतेशेवटी  बैठकीत या दोन विषयांबरोबरच अंगणवाडी सेविकांना स्वतःच्या मोबाईलवर काम करायला लागायचे त्यांना शासन तातडीने नवीन मोबाईल देईल.तसेच अंगणवाडी सेविका नियुक्तीची इयत्ता बारावीची अट जुन्या म्हणजे आधी लागलेल्या मदतीसांना लागू न करता त्यांना दहावी पास या आधीच्या शैक्षणिक अहरतेवर सेवा जेष्ठतेनुसार सेविके पदी पदोन्नती देण्यात येईल हाही निर्णय झाला,असेही पवार म्हणाले. 

हेही वाचा : वारकरी शिक्षण संस्थेत संस्थांचालकाकडून तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार

अंगणवाडी ताई गेले सुमारे दोन महिने संपावर असल्यामुळे त्यांना या काळातले मानधन मिळालेले नाही.यावर करोना काळात उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी दिल्या गेल्या नव्हत्या, त्याचे समायोजन करून त्या काळातील मानधनाचे पैसे आत्ताच्या बंद काळातील दिवसांसाठी देता येईल का ? याबाबत गांभीर्याने विचार करण्याचा विश्वास सचिव आणि आयुक्तांनी दिला.अलीकडेच मदतनीसांची मोठ्या प्रमाणावर भरती झाली होती. काही मदतनीस तर एक महिनाही काम पूर्ण न होता लगेचच चार डिसेंबर पासून संपावर गेल्या होत्या.अशा मदतनिस, तसेच काही जुन्या सेविकांनाही कामावरून काढून टाकण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी प्रत्यक्ष कामावरून काढून टाकण्यात आले होते.त्यानंतरही अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सेवेमधून कमी करण्याविषयी नोटिसा दिल्या गेल्या होत्या. ही सर्व कारवाई रद्द करण्याचे प्रशासनाने मान्य केले.

आशा सेविका यांच्या मानधन वाढीचा घोषणे मुळे आधी झालेल्या मानधन वाढीनंतर आठ महिन्यातच पुन्हा एकदा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आंदोलन करावे लागले होते. त्या आशा सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला तर त्याचवेळी अंगणवाडी ताईंच्याही मानधन वाढीचा प्रस्ताव आपण ठेऊ असे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मान्य केले होते.त्याचा पुनरुच्चार आज प्रशासनाच्या वतीने बैठकीत करण्यात आला.
कृती समितीने बंद मागे घेतल्यानंतर २६ जानेवारी रोजी राज्यभर अंगणवाडी ताईंनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपापल्या अंगणवाड्यांमध्ये देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकवला.आणि आपल्या अंगणवाडीतील चिमुकल्यांबरोबर संवाद साधत त्यांनी आपले कामकाज पुन्हा सुरू केले.