शिक्षक भरतीला का होतोय विलंब ; नवीन वर्ष उजाडले अजून किती थांबायचे, पुढच्या आठवड्यात जाहिरातीची शक्यता

शिक्षक भरतीला का होतोय विलंब ; नवीन वर्ष उजाडले अजून किती थांबायचे, पुढच्या आठवड्यात जाहिरातीची शक्यता

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Teacher Recruitment : शिक्षक भरतीस पात्र असलेल्या उमेदवारांच्या संय्यमाची शिक्षण विभाग (education department) अजून किती प्रतिक्षा पाहणार आहे. कारण पाच महिन्यांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी शिक्षक भरतीची घोषणा केली होती. तसेच महिन्याभरात भरतीची प्रक्रिया सुरू होईल,असेही स्पष्ट केले होते. मात्र,नवीन वर्ष उजाडले तरीही शिक्षक भरतीच्या जाहिरातीला अजून मुहूर्त सापडला नाही. मात्र, आता पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल,असे शिक्षण विभागातील अधिकारी सांगत आहेत.परंतु,जाहिरात येत नाही तोपर्यंत आता कोणावरही विश्वास ठेवणार नाही,अशा प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त केल्या जात आहेत. 

शिक्षक भरतीची प्रक्रिया केव्हा सुरू होणार ? याबाबत थेट शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना एका पात्र तरुण महिला उमेदवाराने विचारणा केली होती.त्यावर केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाली होती.या घटनेला सुद्धा एक महिना होत आला.त्यामुळे महिनाभरापूर्वीच उमेदवारांच्या संयमांचा बांध फुटला आहे. तरीही शिक्षण विभागाकडून भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळे उमेदवार अस्वस्थ आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी माध्यमांशी बोलताना 25 डिसेंबरपर्यंत जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 28 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द होईल,असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना वाटत होते. मात्र,अजूनही राज्याच्या जिल्हा परिषदांकडून भरतीसाठी आवश्यक माहिती प्राप्त झाली नाही.

राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यरत शिक्षकांना अंतरजिल्हा बदलीची संधी देण्यात आली होती. त्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला.मात्र,जिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यानंतर रिक्त झालेल्या जागांची माहिती भरण्याचे काम आता सुरू झाले आहे. पुढील काही दिवसांत हे काम पूर्ण होईल,असे शिक्षण विभागातील अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होऊन काही दिवस झाले तरीही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शिक्षक भरतीच्या जाहिरातीची वाट पहावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

एमपीएससी राज्य समन्वय समितीचे सहसचिव सुरेश सावळे म्हणाले, शालेय शिक्षण विभागाकडून भरतीची केवळ आश्वासने दिली जात आहेत.जाहिरात प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवता येणार आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून उमेदवार भरतीची वाट पाहत आहेत. शासनाने 80 टक्के पद भरतीला मान्यता दिली असली तरीही केवळ 70 टक्के भरती केली जात आहे. परिणामी पात्र उमेदवारांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने 80 टक्के पद भरती करावी,अशी आमची मागणी आहे.
-----------------------------------------