कधी होणार CA परीक्षा ;  सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय 

कधी होणार CA परीक्षा ;  सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार्टर्ड अकाउंटंट्स (CA ) च्या  परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षांच्या तारखा बदलण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. 

निवडणुकीच्या दिवसांमध्ये परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासातील अडचणी, मतदान केंद्रांजवळ जास्त गर्दी आणि सुरक्षा समस्या अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असे याचिकाकर्त्याने म्हटले होते. यावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, " विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार मतदानाचे नियोजन करावे."  ICAI ने अशा परिस्थितींसाठी उपाय आणि सहाय्य करण्यासाठी आधीच व्यवस्था केली आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.


 अशा आहेत  CA  परीक्षेच्या तारखा

* CA इंटर गट I च्या परीक्षा 3, 5 आणि 9 मे 2024 रोजी होणार आहेत.

* CA इंटर गट II च्या परीक्षा 11, 15 आणि 17 मे 2024 रोजी होणार आहेत.

याशिवाय सीएच्या अंतिम परीक्षाही दोन गटात घेतल्या जाणार आहेत.

* गट I ची अंतिम परीक्षा 2, 4 आणि 8 मे 2024 रोजी होणार आहे.

* "गट II ची अंतिम परीक्षा 10, 14 आणि 16 मे 2024 रोजी होणार आहे.

* यासोबतच 14 आणि 16 मे 2024 रोजी इंटरनॅशनल टॅक्सेशन   असेसमेंट टेस्ट देखील घेतली जाईल.

दरम्यान,  ICAI ने नुकतीच एक नवीन घोषणा केली आहे की, ' आतापासून सीए फाऊंडेशन आणि सीए इंटर परीक्षा दरवर्षी तीन वेळा घेतल्या जातील. यापूर्वी या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात होत्या.' आयसीएआयचे सदस्य धीरज खंडेलवाल यांनी ही माहिती दिली. याशिवाय या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांमध्ये उत्तर देण्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी माध्यम निवडण्याची सुविधाही मिळणार आहे.