आम्ही राजकीय पक्ष फोडतो , तुम्ही विद्यार्थी फोडा, जबाबदार मंत्र्याचा शिक्षकांना सल्ला..

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पटसंख्या कमी (Schools with low enrollment) असल्याने बंद करण्याची वेळ आलेली असताना, शिक्षकांनी नुसते हातावर हात धरून बसून राहू नये. आम्ही राजकीय पक्ष जसे फोडतो, तसे तुम्हीही इतर शाळांमधील विद्यार्थी फोडा (Take students from other schools) आणि शाळा वाचवा, असा बेजबाबदार सल्ला जबाबदार मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिक्षकांना दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याने शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. 

आम्ही राजकीय पक्ष फोडतो , तुम्ही विद्यार्थी फोडा, जबाबदार मंत्र्याचा शिक्षकांना सल्ला..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पटसंख्या कमी (Schools with low enrollment) असल्याने बंद करण्याची वेळ आलेली असताना, शिक्षकांनी नुसते हातावर हात धरून बसून राहू नये. आम्ही राजकीय पक्ष जसे फोडतो, तसे तुम्हीही इतर शाळांमधील विद्यार्थी फोडा (Take students from other schools) आणि शाळा वाचवा, असा बेजबाबदार सल्ला जबाबदार मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिक्षकांना दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याने शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. 

जळगावात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातंर्गत तालुकास्तरावरील विजेत्या शाळांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. जळगाव ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सध्या एकूण ४५ हजार विद्यार्थी आहेत, त्यामध्ये अलिकडच्या काळात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. अनेक शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याविषयी या कार्यक्रमात चिंता व्यक्त करताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दुसऱ्या शाळांमधील विद्यार्थी पळवून पटसंख्या वाढविण्याची नामी युक्ती सांगितली. 

मंत्री पाटील यांनी नंतर आपल्या वक्तव्याविषयी सारवासराव करण्याचा प्रयत्न केला. विनोदाने बोलून गेलो. जसे आम्ही एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते आमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करतो, तसे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत करावे, एवढेच म्हणायचे होते. यामध्ये दुसरा चुकीचा भाव नव्हता, पटसंख्या कशी वाढेल हे सांगण्यासाठी थोडा विनोद केला, असे त्यांनी नमूद केले. 

यावेळी माझी शाळा, सुंदर शाळा या राज्यस्तरीय उपक्रमामुळे समाजाचा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, अनेक जिल्हा परिषद शाळा आधुनिक शिक्षण केंद्रात रूपांतरित होत आहेत. मात्र, फक्त शाळा स्वच्छ आणि सुंदर असणे पुरेसे नाही, तर त्या गुणवत्तापूर्णही असल्या पाहिजेत. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने पटसंख्या वाढवून गुणवत्ता वाढीचा संकल्प करावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आपण जर मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवू शकलो असतो, तर आज ५० हजार डीएड झालेली मुले नोकरीला लागली असती, असे त्यांनी नमूद केले. आयुष्यात आपण यापूर्वी बऱ्याच लोकांना त्रास दिला. मात्र, शिक्षकाला कधीच त्रास दिला नाही. कारण शिक्षकांबद्दल आमच्या मनामध्ये एक वेगळे स्थान आहे, असेही त्यांनी सांगितले.