राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे पुनर्लेखन करण्याची मागणी 

या आराखड्यात सुरुवातीलाच म्हटले आहे की, अनेक संस्था, व्यक्तीकडून अभिप्राय मागून हा आराखडा प्रसिध्द केला आहे. हा आराखडा या आधी कधी प्रसिध्द झाला आणि कोणाचे अभिप्राय यात घेतले ते एकदा जाहीर करायला हवे.

राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे पुनर्लेखन करण्याची मागणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य अभ्यासक्रम आराखड्यात (State Syllabus Framework) योग्य भाषांतर व्हायला हवे होते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील अनेक महत्त्वाच्या बाबी राज्य अभ्यासक्रम आराखड्यात वगळल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार (National Syllabus Framework Curriculum) आपण महाराष्ट्रात नेमके काय करणार आहोत? हे राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दिसायला हवे होते. या आराखड्यात सुरुवातीलाच म्हटले आहे की, अनेक संस्था, व्यक्तीकडून अभिप्राय मागून हा आराखडा प्रसिध्द केला आहे. हा आराखडा या आधी कधी प्रसिध्द झाला आणि कोणाचे अभिप्राय यात घेतले ते एकदा जाहीर करायला हवे, असे मत जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे (Dr. Vasant Kalpande) यांनी व्यक्त केले.

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने नुकत्याच प्रसिध्द झालेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन शिक्षणकट्टा आयोजित करण्यात आला होता. या शिक्षण कट्ट्यात शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे, बालभारतीच्या माजी विद्यासचिव धनवंती हर्डीकर, शिक्षण अभ्यासक किशोर दरक, माजी शिक्षण संचालक भाऊ गावंडे, बसंती रॉय, सूर्यकांत कुलकर्णी, भाऊसाहेब चासकर, सुभाष मोरे, सुशील शेजुळे, महेंद्र गणपुले यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्राने सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीत देशाचे नेतृत्व केले आहे. त्याचे प्रतिबिंब राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दिसत नाही. भाषा शिक्षण या विषयी वाटते की, हा आराखडा फक्त मराठी माध्यमाच्या शाळांना विचारात घेऊनच केलेला दिसतो. मराठी बरोबरच महाराष्ट्रात अनेक भाषा माध्यमांच्या शाळा आहेत. त्यांचा विचार यात दिसत नाही.आजची राज्यातील भाषा शिक्षणाची काय स्थिती आहे ? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात काय सुचविले आहे? राज्यात आपण नेमके काय बदल करणार आहोत, अशा या विचार राज्य अभ्यासक्रम आराखड्यात करायला हवा होता, असेही काळपांडे म्हणाले. 

शिक्षण अभ्यासक किशोर दरक म्हणाले,राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मनाचे श्लोक वैगरे पाठांतर करायला सांगणे हे मूळ नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आहे. नवीन शैक्षिणक धोरणात विद्यार्थी जागतिक नागरिक व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या तुलनेत राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील चुका आणि संग्धीगता यामुळे राज्य आराखडा समजणे कठीण आहे. त्यामुळे इतक्या चुका असलेला हा आराखडा अभीप्रायार्थ ठेवणे म्हणजे सर्वांचाच वेळ वाया घालवणे आहे. त्यामुळे हा आराखडा शासनाने परत घेऊन नव्याने समित्या गठित करून याचे पुनर्लेखन करावे. 

शिक्षण अभ्यासक बसंती रॉय म्हणाल्या, एनसीएफ चांगला आहे, पण राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मात्र खूप संदिग्धता दिसून येते. त्याचा अनुवाद योग्य झालेला नाही, काही ठिकाणी अनावश्यक बाबी आलेल्या आहेत.  या आराखड्यावर पाठ्यपुस्तके येणार आहेत. मुळातच अभ्यासक्रम आराखडा आणि पाठ्यपुस्तके याबद्दल शिक्षकांमध्ये उद्बोधन करण्याची गरज आहे. 

अकोले-नगर येथील शिक्षक एटीएफ या शैक्षणिक फोरमचे मुख्य संयोजक भाऊसाहेब चासकर, माजी शिक्षण संचालक नागपूर) भाऊ गावंडे, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, अभ्यासक सूर्यकांत कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, मराठी अभ्यास केंद्राचे सुशील शेजुळे यशवंतराव चव्हाण सेंटरचे कार्यक्रमप्रमुख दत्ता बाळसराफ आणि  शिक्षण विकास मंचाचे समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी या सर्वांनी यावेळी मत व्यक्त केले. 

---------

राज्य अभ्यासक्रम आराखडा हे शिक्षण क्षेत्राच्या खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे. आपल्या लोकशाही देशात भारतीय संविधानाच्या तात्विक चौकटीला हे महत्त्व आहे ते शिक्षणात राज्य अभ्यासक्रम आराखड्याला आहे. त्यामुळे हा आराखडा खूप गांभीर्याने तयार व्हायला हवा होता? पण तसे झालेले दिसत नाही. बोजड भाषा, अर्थांची संग्धिगता, लेखनातील चुका ह्या दुर्लक्ष करता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. हा आराखडा हा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे भाषांतर आहे. तर हे भाषांतर ही प्रसिध्द करण्यापूर्वी तपासले गेलेले दिसत नाही . त्यामुळे असा आराखडा शासनाने परत घेऊन पुन्हा नव्याने याचे लेखन करावे मग तो अभिप्रायार्थ ठेवावा. 

धनवंती हर्डीकर, माजी विद्यासचिव,  बालभारती

_________________________________