बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांवरील कारवाईसाठी 6 सप्टेंबरला आंदोलन; आमदार बच्चू कडू
शासकीय व निमशासकीय सेवेत विविध विभागामध्ये नियुक्ती मिळालेल्या बोगस प्रमाणपत्र धारक एकूण ३५९ उमेदवारांची नावे निदर्शनास आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यासह देशात गाजलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS officer Pooja Khedkar) यांच्या बोगस प्रमाणपत्र (Bogus certificate) प्रकरणानंतर दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत (Disabled Welfare Commissionerate) महत्वाचे पाऊल उचलण्यात आले . दिव्यांगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होतो यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत १९ जुलै २०२४ ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ‘बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान’ (Bogus Disability Certificate Search Campaign) राबवण्यात आले होते. या अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेत विविध विभागामध्ये नियुक्ती मिळालेल्या एकूण ३५९ बोगस प्रमाणपत्र धारक उमेदवारांची नावे निदर्शनास आली आहे.त्यांच्यावर कारवाई न झाल्यास येत्या 6 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल,असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून जे उमेदवार बोगस आढळतील त्यांच्यावर १५ दिवसांच्या आत कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती. तपासादरम्यान जे दिव्यांग उमेदवार बोगस आढळतील त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.त्यानुसार येत्या 6 सप्टेंबर रोजी आंदोलन केले जाणार असल्याचे पत्र आमदार बच्चू कडू यांनी आयोगाला दिले आहे.
संशयित उमेदवारांची दिव्यांगत्व तपासणी करून त्यातील सत्यता पडताळण्यासाठी दिव्यांगत्व आणि प्रमाणपत्र पुनर्तपासणी करून पडताळणी करण्यात यावी व बोगस दिव्यांगत्व सापडल्यास त्यांच्यावर कार्यवाही करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. या कर्मचाऱ्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी बोगस प्रमाणपत्राचा आधार घेऊन काम करत असतात. मागील काही दिवसांमध्ये अनेक बोगस प्रमाणपत्राच्या घटना समोर येत आहेत.
---------------
MPSC मधून विविध पदावर दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या संशयित उमेदवारांची जी यादी आपल्या कार्यालयास सादर केली आहे. या संशयित उमेदवारांची मेडीकल तपासणी करून जे उमेदवार बोगस सापडतील त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. सदर कारवाई १५ दिवसाच्या आत करणे अपेक्षित आहे. तसेच मागील १० वर्षात दिव्यांग कोट्यातून MPSC मधून निवड झालेल्या सर्व संवर्गाचे उमेदवारांचे फेर मेडीकल व दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची कारवाई अपेक्षित आहे. कारवाई न झाल्यास 6 सप्टेंबर रोजी आंदोलन केले जाईल, असे निवेदन आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले आहे.