टीईटी परीक्षेसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर; MPSC पेक्षा अधिक कडक परीक्षा, फेस रीडिंग, बायोमेट्रिक घेणार
पेपर फुटीच्या घटना आणि TET परीक्षेत झालेला गैरव्यवहार ही पार्श्वभूमी लक्षात घेता परीक्षा परिषदेने यंदा परीक्षेसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Examination Council) माध्यमातून येत्या 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा (Teacher Eligibility Test -TET) घेतली जाणार आहे. पेपर फुटीच्या घटना आणि TET परीक्षेत झालेला गैरव्यवहार ही पार्श्वभूमी लक्षात घेता परीक्षा परिषदेने यंदा परीक्षेसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर (Use of AI technology) केला आहे. तसेच मेटल डिटेक्टरने प्रत्येक विद्यार्थ्याची कसून तपासणी (Thorough screening of every student with metal detectors) केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेपूर्वी दीड तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे,असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे (State Examination Council Chairman NandKumar Bedse)यांनी सांगितले.
परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 21 नोव्हेंबर 2021 रोजी शेवटची टीईटी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठी 4 लाख 68 हजार 679 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परिषदेतर्फे दहा नोव्हेंबर रोजी आठवी टीईटी परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यातून 3 लाख 53 हजार 937 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १५ हजार ६२६ तर विद्यार्थिनींची संख्या २ लाख ३७ हजार ४१७ असून ९ ट्रान्सजेंडर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. TET परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 887 आहे.
परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केल्यानंतरच त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची फेस रीडिंग तसेच बायोमेट्रिकच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. अर्ज भरताना दिलेल्या माहितीनुसार ही तपासणी केली जाणार असून परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही बदल असल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून राज्यभरातील केंद्रांवर वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.
एखाद्या परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक काही मिनिटे एका जागेवरून दुसऱ्या जागी हलला नाही तरीसुद्धा या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अलर्ट दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे 30 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त व्यक्ती एखाद्या केंद्रावर किंवा वर्गात कुठून आले हे सुद्धा तपासण्याचे यंत्रणा उभी करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा अद्याप अशा पद्धतीची परीक्षा घेतली नाही,असा दावा परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. राज्यातील 1 हजार 23 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा होणार असून वर्ग खोल्या, केंद्र, संचालक कार्यालय, प्रवेशद्वार व बाहेर जाण्याचे द्वार अशा एकूण 18 हजार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
-----------------------
माध्यम निहाय विद्यार्थी संख्या :
मराठी : 274435
इंग्रजी : 21588
उर्दू : 17659
हिंदी : 39302
बंगाली : 115
कन्नड : 799
तेलगू : 14
गुजराती : 25
सिंधी : 0
--------------------------------
1. Frisking (HHMD)
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक परीक्षार्थी व परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने Frisking केले जाणार आहे. त्यामुळे कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाइस, मेटलचे साहित्य विद्यार्थ्यांना घेवून परीक्षा केंद्रात जाता येणार नाही.
2. परीक्षार्थीचे बायोमेट्रीक व Face Recognition
परीक्षार्थीने आवेदनपत्र भरताना फोटो दिलेला आहे. सर्व परीक्षार्थीच्या फोटोचा डाटा बेस तयार केला आहे. परीक्षार्थी परीक्षा केंद्रात प्रवेश करत असताना त्यांचे बायोमेट्रीक घेतले जाणार आहे, त्या आधारे त्याची हजेरी लावली जाणार आहे. तद्नंतर फोटो काढून सदर फोटो आवेदनपत्रावरील फोटोशी जुळतो की नाही याची खातरजमा करून मगच परीक्षार्थीस प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे तोतया विद्यार्थी प्रवेशास प्रतिबंध होईल.
3. CCTV कॅमेरा बसविणे, कॅमेऱ्याचा Live Access व Artificial Intelligence Based Serveilliance -
परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारांवर, प्रत्येक परीक्षा दालनात व केंद्रसंचालकांच्या कक्षात CCTV बसविण्यात येणार आहेत. तसेच या कॅमेराचा Live Access शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. (सर्व) यांचे कार्यालयात, व राज्यस्तरावर परीक्षा परिषदेत घेण्यात आला आहे. तसेच या यंत्रणेद्वारे A.I (Artificial Intelligence) च्या मदतीने सातत्याने सनियंत्रण केले जाणार आहे. म्हणजेच एखाद्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास, परीक्षा दालनात पर्यवेक्षकांनी फेऱ्या न मारता एकाच ठिकाणी उभे राहिल्यास, विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्था हालविल्यास, तसेच अन्य कोणत्याही गैर हालचाली झाल्यास तात्काळ प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात व महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतील नियंत्रण कक्षात अलार्म येणार आहे. त्यानुसार तात्काळ अनुषंगिक सूचना केंद्रसंचालकांना दिल्या जाणार आहेत. संबंधित सर्व जिल्ह्यांचा नियंत्रण कक्ष (War Room) परीक्षा परिषदेत उभारण्यात आला आहे.