विद्यापीठाचे परीक्षा केंद्र बनले कॉपी सेंटर

विद्यापीठाशी संलग्न ५१३ महाविद्यालयांना प्रभारी प्राचार्य तर १९ महाविद्यालयांना प्राचार्य नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

विद्यापीठाचे परीक्षा केंद्र बनले कॉपी सेंटर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) काही परीक्षा केंद्र (exam centre) हे कॉपी सेंटर बनले असून विद्यापीठ प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचा आरोप विद्यापीठाच्या आधिसभेच्या बैठकीत करण्यात आला. तसेच विद्यापीठाशी संलग्न ५१३  महाविद्यालयांना प्रभारी प्राचार्य (principal in charge ) तर १९  महाविद्यालयांना प्राचार्य (principal) नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

हेही वाचा : शिक्षण विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे अधिसभेत वाभाडे


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक पार पडली. त्यात सिनेट सदस्य डॉ.चिंतामण निगळे यांनी संलग्न महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संदीप पालवे यांनी उत्तर दिले. त्यादरम्यान विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ एक्झाम तर्फे प्राचार्य नसलेल्या महाविद्यालयांना सुद्धा परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे काही अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालये ही कॉपी सेंटर झाली आहेत. त्याचा विद्यापीठाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा सेंटरची चौकशी करून त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. 

काही महाविद्यालयांमध्ये एकही मान्यता प्राप्त प्राध्यापक नसल्याचे पालवे यांनी सांगितले. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये पारदर्शकपणे परीक्षा घेतल्या जातात का? यावर आधिसभा सदस्यांनी आवाज उठवला. त्याचप्रमाणे एका महाविद्यालयाचे प्राचार्य हे एमए. बीएड. असल्याची धक्कादायक माहिती अधिसभा सदस्यांनी सांगितली.
दरम्यान,  विद्यापीठाच्या सत्र परीक्षांमध्ये काही परीक्षा केंद्रांवर कॉपी सारखे प्रकार होऊ नयेत, यासाठी भरारी पथकांमार्फत तपासणी केली जाईल. पूर्णवेळ प्राचार्य किंवा मान्यताप्राप्त प्राध्यापक असल्याशिवाय परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. परीक्षेच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिले.
----------------
अधिसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा...

पुणे विद्यापीठाच्या मागील आधिसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गरजू विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे विद्यापीठाच्या आधिसभा सदस्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देत विद्यापीठाला या योजनेची आठवण करून दिली. त्यावर पुढील पंधरा दिवसात या योजनेबाबत परिपत्रक काढले जाईल असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.