SPPU News : परीक्षा विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष गेले वाया

अधिसभा सदस्याचे पत्र विद्यापीठ प्रशासन गंभीरपणे घेत नसेल तर विद्यार्थ्यांची काय अवस्था होत असेल, असा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे.  

SPPU News : परीक्षा विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष गेले वाया
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या (SPPU) परीक्षा विभागातील (Examination Department) बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत विद्यापीठाचे अधिसभा सदस्य गणपत नांगरे (Ganpat Nangare) यांनी विद्यापीठाला पत्र देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. पत्र देऊन एक महिना झाला तरीही संबंधित विद्यार्थ्यांचा विषय परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी लॅप्सेस कामिटीपर्यंत पोहचवलाच नाही. अधिसभा सदस्याचे (Senate Member) पत्र विद्यापीठ प्रशासन गंभीरपणे घेत नसेल तर विद्यार्थ्यांची काय अवस्था होत असेल, असा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे.

 

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांनी परीक्षा विभागाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये नियोजित कालावधीत विद्यार्थ्यांचे गुण भरणे आवश्यक आहे. मात्र काही प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना चुकीचे गुण दिले जातात किंवा गुण द्यायचे राहून जातात. त्यामुळे विद्यार्थी नापास होतात. त्यात विद्यार्थ्यांची कोणतीही चुका नसते. त्यामुळे अशी प्रकरणे विद्यापीठाच्या प्रमाद समिती  (लॅप्सेस कामिटी) समोर ठेवली जातात. महिन्याभरापूर्वी झालेल्या लॅप्सेस कमिटीने काही प्रकरणांची सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढली. तसेच दोषी प्राध्यापकांना आर्थिक दंड करून या पुढील काळात अशी चुक होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत समाज बजावली. परंतु, काही महाविद्यालयांची प्रकरणे प्रमाद समितीसमोर येतच नाहीत.

विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली अन् कागदपत्रे अडविल्यास कडक कारवाई; विद्यापीठाची महाविद्यालयांना ताकीद

 

प्रमाद समितीमध्ये परीक्षेच्या कामात झालेल्या त्रुटीवर व प्राध्यापकांकडून झालेल्या चुकांवर चर्चा करून विद्यार्थ्यांना गुण द्यावेत किंवा देऊ नयेत, यावर निर्णय घेतला जातो. मात्र, पुण्यातील गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यातील सुमारे १० विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणदानात झालेल्या त्रुटीमूळे निकालात नापास दाखवण्यात आले. 

 

याबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यापीठाने दिलेल्या कालावधीत परीक्षा विभागाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा विषय नियोजित वेळेत प्रमाद समितीपर्यंत पोहचवलाच नाही. त्यानंतर अधिसभा सदस्य गणपत नांगरे यांनी विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला. तरीही हा विषय प्रमाद समितीपर्यंत आला नाही. काही बेजबादार अधिकारी व कर्मचारी यांनी कॉलेजचे पत्र व अधिसभा सदस्यांचे पत्र गहाळ केले. त्यामुळे दहा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.

 

अधिकाऱ्यांच्या मुला -मुलींबाबत असा बेजबाबदारपणा होईल का?

″ऑनलाईन गुण भरण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी विद्यापीठाने दिलेल्या कालावधीत कॉलेजतर्फे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे वेळेत पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, या पत्रांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दहा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. असा बेजबाबदारपणा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मुला -मुलींच्या बाबत परीक्षा विभागाने दाखवला असता का? या विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कोण भरून देणार आहे.″

- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी न केल्यास विद्यापीठांवर कारवाई; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

 

दोषींवर कारवाई करावी

″विद्यापीठ हे विद्यार्थी हितासाठी आहे का ? असा प्रश्न मला पडत आहे. विद्यापीठाकडे अधिसभा सदस्य म्हणून पत्रव्यवहार केलेला असताना त्यावर कार्यवाही झाली नाही. मॉडर्न कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा विषय प्रमाद समितीसमोर आलाच नाही. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांकडून कॉलेजचे पत्र गहाळ झाले. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. हा विषय गंभीर असून विद्यापीठाने संबंधित दोषींवर कारवाई करावी.″

- गणपत नांगरे, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k