६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी हॅकाथॉन स्पर्धेला सुरूवात; या तारखेपर्यंत नोंदणीस मुदत
या उपक्रमांतर्गत NEP २०२०,NCF २०२३, UN SDG यानुसार १५ विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
STARS प्रकल्पा अंतर्गत (STARS Project) ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी हॅकाथॉन या उपक्रमाचे आयोजन (Organizing hackathon activities) करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याची रुजवणूक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यातून किमान १ हजार विद्यार्थी नोंदणी होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व माहिती अवगत करून सहभागी करून घ्यावे, असे शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या उपक्रमांतर्गत NEP २०२०,NCF २०२३, UN SDG यानुसार १५ विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी व हॅकेथोन उपक्रमासंदर्भात सक्षमपणे कार्यवाही करण्यासाठी राज्य स्तरावर त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या विषयांतर्गत प्रतिकृती अथवा मॉडेल तयार करून सहभागी व्हायचे आहे. यासाठी प्रस्तुत परिषदेमार्फत https://maa.ac.in/SCERTMahaHackathon नोंदणी लिंक देण्यात आली आहे. सदर लिंक ही दिनांक १५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यी नोंदणीसाठी खुली राहणार असून शिक्षकांनी नोंदणी करणे अपेक्षित आहे. सहभागी होण्याबाबत सगळ्या सूचना लिंकवर देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित व शासकीय शाळेतील सर्व इयत्ता ६ ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत अवगत करून मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे. सदर उपक्रमासंदर्भात काही शंका असल्यास जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावर प्रसिद्धी द्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.