दहावी आणि बारावीच्या जुलै-ऑगस्ट 2025 च्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी करण्यासाठी १ हजार ११० रुपये तर प्रक्रिया शुल्क १०० असणार आहे.

दहावी आणि बारावीच्या जुलै-ऑगस्ट 2025 च्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क   

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी (For class 10th and 12th exams) अर्ज प्रक्रिया (Application process) सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून यावर्षी प्रथमच जुलै-ऑगस्ट 2025 च्या परीक्षांसाठी (July-August 2025 exams) ही संधी देण्यात आली आहे. नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.  

इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरता सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालय मंडळाच्या अटी,शर्तीनुसार नाव नोंदणी करण्याकरता उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच या संदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

दरम्यान, खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी फेब्रुवारी- मार्च 2025 च्या परीक्षेच्या वेळी ज्या अटी व शर्ती निर्धारित करण्यात आल्या होत्या, त्याच अटी व शर्ती जुलै-ऑगस्ट 2025च्या परीक्षेसाठी कायम राहणार आहेत. तसेच हा अर्ज फक्त नियमित शुल्काने घेण्यात येणार असून यासाठी विलंब, अतिविलंब शुल्काची मुदत असणार नाही व मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

तसेच खाजगी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि आता बारावीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे. तसेच खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी आणि बारावीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा द्यायची आहे त्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतांक, विषय योजना, माध्यम,  शाखा व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी असेही शिक्षण विभागाने सांगितले आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी करण्यासाठी १ हजार ११० रुपये तर प्रक्रिया शुल्क १०० असणार आहे.