शिक्षक भरती अपडेट: समांतर आरक्षणातील कान्व्हर्जन राऊंडमुळे मिळेल पहिल्या फेरीत स्थान 

समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी पूर्वतयारी केली जात आहे.त्यामुळे पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.

शिक्षक भरती अपडेट: समांतर आरक्षणातील कान्व्हर्जन राऊंडमुळे मिळेल पहिल्या फेरीत स्थान 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education)पवित्र पोर्टलच्या (Pavitra portal) माध्यमातून शिक्षक भरतीची (Teacher Recruitment)प्रक्रिया राबवली जात असून निवड समितीतर्फे  समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी (Conversion Round) पूर्वतयारी केली जात आहे. त्याबाबत सुध्दा प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरातलवकर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.त्यामुळे पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच जास्तीत जास्त उमेदवार विदाऊट इंटरव्यू (Without an interview) या टप्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे, असे शिक्षण विभागातर्फे बुलेटीनद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

शिक्षक भारतीबाबत केल्या जात असलेल्या उपाय योजनांबाबत तसेच उमेदवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत शिक्षण विभागातर्फे बुलेटीन प्रसिध्द केले जाते.त्यात समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीची पूर्व तयारी सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्या संदर्भात उमेदवार, त्यांचे पालक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही, अशा उमेदवारांनीसुद्धा या प्रक्रियेच्या निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. यावरही कोणाची पदभरती संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठित केली आहे.या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठित केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमांवरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे, तक्रार निवारण समितीकडील अर्जाचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागत आहे. प्रशासकीय मुद्द्यांबाबत समाज माध्यमांमधून अनाठायी शंका उपस्थित करणे अथवा अन्यप्रकारे अडथळे निर्माण करणे यातून वेळा वाया जात आहे.त्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी विलंब होत असल्याचेही बुलेटीनमध्ये नमूद करण्यात आले आहे.