छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षानिमित्त विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती

विज्ञान आणि तंत्रज्ञान , वाणिज्य आणि व्यवस्थापन , आंतरविद्याशाखीय व मानव्यविज्ञान विद्या शाखा अशा विद्याशाखानिहाय प्रत्येकी ८७ विद्यार्थ्यांना अशा एकूण ३५० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षानिमित्त विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष  २०२३ - २०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती (Chhatrapati Shivaji Maharaj Scholarship) लागू करण्यात आली आहे. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये/ विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक/अव्यावसायिक नियमित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच एप्रिल/मे २०२३ मध्ये गुणवत्ता यादी मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष  २०२३ - २०२४ पासून लागू करण्यात आली आहे.या शिष्यवृत्ती योजनेकरिता विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३५० वर्ष पूर्ण होत असल्याने ही  योजना शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ मध्ये चारही  म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान , वाणिज्य आणि व्यवस्थापन , आंतरविद्याशाखीय व मानव्यविज्ञान विद्या शाखा अशा विद्याशाखानिहाय प्रत्येकी ८७ विद्यार्थी असे एकूण ३५० विद्यार्थ्यांना देण्यात येईल. 

एखादया विद्याशाखेत गुणवत्ता धारक कमी असतील तर तेवढी संख्या इतर विद्याशाखेतील उपलब्धतेनुसार वर्ग करण्यात येईल. त्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ च्या अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय अशा गुणवत्तेनुसार प्रत्येक पात्र विद्यार्थ्यास प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात येईल. परंतु, सदर विद्यार्थ्यांने शासनाची इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. त्यासंदर्भात विभागप्रमुख/ प्राचार्य यांचे शिफारस पत्र घेण्यात येईल. या योजनेसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार असून समितीच्या शिफारशीनुसार मान्यता घेऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल. 

---------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ३५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तसेच यासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

-डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

--------------------------------

विद्यापीठाच्या निधीतून विविध शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी विद्यापीठातर्फे अधिक प्रयत्न केला जात आहे. ही शिष्यवृत्ती त्याचाच एक भाग आहे.  
-डॉ.  पराग काळकर, प्र - कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

-------------------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमीच विद्यार्थी हिताचे निर्णय घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संशोधनासाठी चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षानिमित्त या वर्षांपासून ३५० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 
- डॉ.  विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ